महिला प्रीमियर लीग १४ फेब्रुवारीपासून रंगणार

  • By admin
  • January 17, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर; अंतिम सामना मुंबईत

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला प्रीमियर लीग स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम येत्या १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या लीगचा अंतिम सामना १५ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

महिला प्रीमियर लीग पहिल्यांदाच चार शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये बडोदा, बंगळुरू, मुंबई आणि लखनौ या शहरांचा समावेश आहे.

स्पर्धेत एकूण २२ सामने
या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. सर्व संघ एकमेकांविरुद्ध २-२ सामने खेळतील. अशा प्रकारे एक संघ एकूण आठ सामने खेळेल. या स्पर्धेत एकूण २२ सामने खेळवले जातील. १४ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत लीग टप्प्यातील २० सामने खेळवले जातील. मनोरंजक गोष्ट म्हणजे यावेळी कोणत्याही दिवशी डबल हेडर होणार नाहीत, म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने खेळवले जाणार नाहीत.

गुजरात आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना
महिला प्रीमियर लीगची सुरुवात बडोद्यातील नव्याने बांधलेल्या बीसीए स्टेडियममध्ये होईल. पहिला सामना गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. बडोदा आणि लखनौ हे दोन्ही शहर पहिल्यांदाच लीगचे आयोजन करतील तर मुंबई पुन्हा एकदा स्थळांच्या यादीत परतली आहे. महिला प्रीमियर लीग २०२४ चे आयोजन बंगळुरू आणि नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

अंतिम सामना मुंबईत
या स्पर्धेचा अंतिम सामना १५ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल. गतविजेत्या आरसीबीचा पहिला घरचा सामना २१ फेब्रुवारी रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. या ठिकाणी ते माजी विजेत्या मुंबई इंडियन्सशी खेळतील,‘ असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

लखनौमध्ये चार सामने
पहिल्यांदाच लीगचे आयोजन करणाऱ्या लखनौमध्ये ३ मार्चपासून यजमान संघ यूपी वॉरियर्सचे चार सामने होणार आहेत. स्पर्धेचा शेवटचा टप्पा मुंबईत होणार आहे आणि प्रतिष्ठित क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे शेवटचे दोन लीग सामने आणि दोन प्ले-ऑफ सामने – एलिमिनेटर (१३ मार्च) आणि अंतिम सामना होणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दररोज एक सामना
गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणारे संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले संघ अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एलिमिनेटरमध्ये खेळतील. मागील हंगामाच्या स्वरूपाचे पालन करत, दररोज फक्त एकच सामना होईल.

महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक

१४ फेब्रुवारी : गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (वडोदरा)
१५ फेब्रुवारी : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (वडोदरा)
१६ फेब्रुवारी : गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (वडोदरा)
१७ फेब्रुवारी : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (वडोदरा)
१८ फेब्रुवारी : गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (वडोदरा)
१९ फेब्रुवारी : यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (वडोदरा)
२१ फेब्रुवारी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरू)
२२ फेब्रुवारी : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरू)
२४ फेब्रुवारी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरू)
२५ फेब्रुवारी : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (बंगळुरू)
२६ फेब्रुवारी : मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरू)
२७ फेब्रुवारी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स (बंगळुरू)
२८ फेब्रुवारी : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरू)
१ मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरू)
३ मार्च : यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (लखनौ)
६ मार्च : उत्तर प्रदेश वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (लखनौ)
७ मार्च : गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (लखनौ)
८ मार्च : यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (लखनौ)
१० मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (मुंबई)
११ मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (मुंबई)
१३ मार्च : एलिमिनेटर सामना (मुंबई)
१५ मार्च : अंतिम सामना (मुंबई)

(सर्व सामने संध्याकाळी ७:३० वाजता खेळवले जातील)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *