
बांगलादेश संघाचा ९३ गुणांनी धुव्वा; भारताची अश्विनी शिंदे सर्वोत्कृष्ट खेळाडू
बाळासाहेब तोरसकर

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने आपली विजयी झंझावात कायम ठेवत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय महिला संघाने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेश संघाचा पाडाव केला. भारतीय महिलांचे आक्रमण इतके जोरदार होते की त्यापुढे बांगलादेश संंघाचा सहज पाडाव होणार हे लक्षात आल्याने प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच ढोल ताशांचा नगारा वाजवणे सुरु केले होते. भारताची कर्णधार प्रियंका इंगळेने सरसेनापतीची भूमिका बजावत एक-एक खेळाडू बाद करताना जरासुद्धा दयामाया दाखवली नाही. तिला प्रमुख सरदाराच्या भूमिकेतील रेश्मा राठोड हिने व नसरीन शेख हिने मोलाची साथ दिल्याने बांगलादेशला माघारीची संधी सुद्धा न देता सरळ सरळ मोठा पराभव केला
.
भारतासाठी हा विजय खूप मोलाचा होता. यापुढे अजून दोन लढती असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरवण्यासाठी भारतीय छावणीत जोरदार तयारी केली होती आणि ती पूर्ण करण्यात सरसेनापती प्रियांका इंगळेने जरासुद्धा कसूर केली नाही. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना भारताने ५० गुणांची कमी केली. तर संरक्षणात ६ ड्रीम रान मिळवत हाफ टाइमला ५६-०८ अशी मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर तोच धडाका कायम राखत भारताने बांगलादेशचा १०९-१६ असा ९३ गुणांनी धुव्वा उडवत खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या टर्नमध्ये भारतीय संघाने आपली पकड आणखी मजबूत केली. प्रियंका इंगळे, अश्विनी शिंदे, आणि रेशमा राठोड यांनी अप्रतिम ड्रीम रन साकारत तब्बल ५ मिनिटे ३६ सेकंद खेळ केला. भारताने या टर्नमध्ये ६ गुण जोडले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने पुन्हा वर्चस्व गाजवत शंभर गुणांचा टप्पा पार केला. रेश्मा राठोडच्या प्रभावी स्काय डाईव्हने संघाने आपला विजय सुनिश्चित केला. या टर्नच्या शेवटी स्कोर १०६-८ असा होता. शेवटच्या टर्नमध्येही भारताचा खेळ एकतर्फी राहिला. भारतीय संघाने आणखी तीन गुणांची ड्रीम रन साकारत सामना १०९-१६ अशा निर्णायक फरकाने जिंकला.
सामन्यातील पुरस्कार
सामन्याचा सर्वोत्तम आक्रमक : मागाई माझी (भारत)
सामन्याचा सर्वोत्तम बचावपटू : ऋतुराणी सेन (बांगलादेश)
सामन्याची उत्कृष्ट खेळाडू : अश्विनी शिंदे (भारत)
इतर उपांत्य फेरी निकाल
महिला गटात युगांडाने न्यूझीलंडचा ७१-२६ ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेने केनियाचा ५१-४६ च्या निसटत्या फरकाने पराभव केला. नेपाळने इराणचा १०३-८ ने धुव्वा उडवला.
पुरुष गटात इराणने केनियाला ८६-१८ ने पराभूत केले. दक्षिण आफ्रिकाने इंग्लंडचा ५८-३८ ने विजय मिळवला.नेपाळने बांगलादेशचा ६७-१८ ने सहज पराभव केला.