राज्य नेटबॉल स्पर्धेत परभणी संघाला मुला-मुलींच्या गटात कांस्यपदक

  • By admin
  • January 18, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

परभणी : धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत परभणी जिल्ह्याच्या १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने कांस्यपदक प्राप्त करत स्पर्धा गाजवली. 

महाराष्ट्र हौशी नेटबॉल असोसिएशन व धुळे जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ज्युनिअर व सब ज्युनिअर अशा दोन गटात झाली. 

या राज्यस्तरीय स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील ज्युनिअर नेटबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कांस्यपदक प्राप्त केले. मुलांच्या साखळी सामन्यात जळगाव, धाराशिव, अकोला, ठाणे, अमरावती या संघाला नमवत परभणी संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सोलापूर संघासोबत १२-४ असा सहज विजय मिळवून परभणी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या उपांत्य सामन्यांमध्ये परभणी संघाचा भंडारा संघाकडून ११-१३ असा निसटता पराभव झाला. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा सामना छत्रपती संभाजीनगर आणि परभणी यांच्यात झाला व परभणी ज्युनिअर संघाने अतिशय चांगला खेळ दाखवत स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले.

या संघात आशिष गायकवाड (कर्णधार), सतिष खरोडे (उपकर्णधार), पांडुरंग कणे, आदित्य कांबळे, परमेश्वर जनजवळे, कोंडिबा काळे, अजय गायकवाड, अभिषेक गाढवे, सोमेश बायस, नागेश भडके, शाम चव्हाण, विठ्ठल कणे या खेळाडूंचा समावेश आहे. 

१९ वर्षांखालील मुलींच्या संघाने देखील या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली. परभणी संघाने कोल्हापूर, बुलढाणा, सोलापूर या संघांना साखळी सामन्यात नमवले व उपांत्यपूर्व फेरीत बीड संघावर मात केली. उपांत्य फेरीच्या सामन्यात भंडारा संघाविरूद्ध पराभव स्वीकारल्यानंतर तृतीय क्रमांकासाठी परभणी आणि पुणे असा सामना झाला. या सामन्यात ज्युनिअर मुलींच्या संघाने पुणे संघाला ८-३ असे नमवून कांस्यपदक प्राप्त केले.

या संघात साक्षी चव्हाण (कर्णधार), रोहिणी उफाडे (उपकर्णधार), नंदिनी भोरे, अश्विनी लोखंडे, रागिणी वानखेडे, श्रेया टेकाळे, शितल शिंदे, प्रीती काकडे, तेजल शेंगुळे, दिव्या श्रीखंडे, मयुरी मस्के, अक्षरा नरवडे या खेळाडूंचा समावेश आहे.
विजयी संघाला राष्ट्रीय प्रशिक्षक महेशकुमार काळदाते, पूजा श्रीखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघासोबत व्यवस्थापक मयुरी जावळे, रिचा नऊसुपे, सानिया गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती.

महाराष्ट्र हौशी नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिनभाई कामदार, महा सचिव डॉ ललित जिवाणी, सहसचिव श्याम देशमुख, परभणी जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव कैलास माने, माणिक कदम, क्रीडा अधिकारी संजय मुंढे, नानसिंग बशी, सुयश नाटकर, कल्याण पोले, साडेगाव माजी सरपंच शेषराव भांगे, बँक अधिकारी हनुमान देवडे, नंदकिशोर कुंडगीर, विश्वास पाटील, ज्ञानेश्वर बायस, मनीष जाधव, मानव माने, पांडुरंग हजारे, गणेश सौदागर, अनिल डवरे, अजय काळे, प्रणव यादव, गणेश दराडे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *