< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); येवल्याच्या मायबोली दिव्यांग शाळेने पटकावली २२ पदके  – Sport Splus

येवल्याच्या मायबोली दिव्यांग शाळेने पटकावली २२ पदके 

  • By admin
  • January 18, 2025
  • 0
  • 43 Views
Spread the love

नाशिक जिल्हा दिव्यांग क्रीडा स्पर्धा 

येवला : नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत येवला येथील मायबोली दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले. मायबोली शाळेने या स्पर्धेत नऊ सुवर्णपदकांसह एकूण २२ पदके जिंकली. 

जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नाशिक व सक्षम फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नाशिक येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत समता प्रतिष्ठानच्या मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयातील २३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी नोंदवत शानदार यश संपादन केले. ८ ते १२ या वयोगटांमध्ये लांब उडी क्रीडा प्रकारात प्रतिक्षा किरण जाधव हिने प्रथम क्रमांक मिळविला तर ५० मीटर धावणे व लांब उडी या क्रीडा प्रकारात साई राहुल बोऱ्हाडे याने द्वितीय क्रमांक मिळविला.

१३ ते १६ या वयोगटांमध्ये लांब उडी या प्रकारात साई सूर्याजीराव झाल्टे याने प्रथम क्रमांक तर १०० मीटर धावणे या प्रकारात भाग्यश्री किरण जाधव हिने द्वितीय क्रमांक मिळविला. गोळाफेक या प्रकारामध्ये प्रतीक्षा देवरे हिने प्रथम क्रमांक तर पूजा नंदू जगताप हिने तृतीय क्रमांक मिळविला.

१७ ते २१ या वयोगटांमध्ये २०० मीटर धावणे या प्रकारात साईराम देवकाते याने प्रथम क्रमांक व पवन फापाळे याने द्वितीय क्रमांक मिळविला तर मुलींमध्ये ज्ञानेश्वरी कड हिने द्वितीय क्रमांक व तेजश्री केसकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावणे या प्रकारात संदेश केसकर याने प्रथम क्रमांक तर आदित्य सालपुरे याने द्वितीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये शिवानी संजय हिरे हिने प्रथम क्रमांक व जयश्री रामदास पगारे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.

१७ ते २१ या वयोगटासाठी घेण्यात आलेल्या लांब उडी या प्रकारामध्ये मुलांमध्ये संदेश केसकर प्रथम क्रमांक तर पवन फापाळे याने द्वितीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये ज्ञानेश्वरी कड हिने प्रथम क्रमांक व शिवानी हिरे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये मुलांमध्ये साईराम देवकाते याने प्रथम क्रमांक व आदित्य सालपुरे याने द्वितीय क्रमांक पटकविला तर गोळा फेक याच क्रीडा प्रकारात मुलींमध्ये जयश्री रामदास पगारे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक विभागीय उपायुक्त माधव वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, सक्षम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सेंट झेवियर हायस्कूलचे मुख्य फादर या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली.

या क्रीडा स्पर्धेत मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी ९ सुवर्ण, १० रौप्य तर ३ कांस्य पदके अशी एकूण २२ पदके पटकावली आहेत. सर्व स्पर्धकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, माजी आमदार मारुतराव पवार व संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, वैसाका भरत चौधरी, सहाय्यक सल्लागार कैलास उईके, संस्थेचे सरचिटणीस दिनकर दाणे, संस्थेचे संचालक शरद कोकाटे, सलील पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे आदींनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील हेमंत पाटील, सुखदेव आहेर, संतोष कोकाटे, मंदा पडोळ, रेखा दुनबळे, रावसाहेब खराटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *