
रोहित शर्माची कर्णधारपदी निवड, शुभमन गिलकडे उपकर्णधारपद
मुंबई : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली. युवा फलंदाज शुभमन गिल संघाचा उपकर्णधार असणार आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीचा सामना बांगलादेश संघाशी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा समावेश नाही. या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरद्धच्या कसोटी मालिकेत युवा अष्टपैलू खेळाडू नीतिश कुमार रेड्डी याने प्रत्येक सामन्यात दखलपात्र कामगिरी नोंदवली. परंतु, या संघात नीतिश रेड्डी याचाही समावेश करण्यात आलेला नाही हे विशेष. सध्या विदर्भ संघाचा कर्णधार करुण नायर हा अप्रतिम फॉर्ममध्ये खेळत आहे. करुण नायर याने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आठ सामन्यात ७५२ धावा काढल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. करुण नायरचा समावेश भारतीय संघात होईल अशी चर्चा होत होती. परंतु, करुण नायर याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आलेली नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंड संघाविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. इंग्लंडविरुद्ध बुमराहच्या जागी हर्षित राणा खेळणार आहे. आक्रमक फलंदाज संजू सॅमसन याचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.