
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : मुकीम शेख सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत मासिया संघाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर १२८ धावांनी दणदणीत विजय साकारत आगेकूच केली. या सामन्यात मुकीम शेखने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. मासिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत १९.१ षटकात तीन बाद १९६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. मुकीम शेख आणि निकित चौधरी या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात करत १३ षटकात १३१ धावांची सलामी दिली. मुकीम शेख ५० चेंडूत ७७ धावा काढून बाद झाला. मुकीमने १२ चौकारांसह ७७ धावांची धमाकेदार खेळी साकारली. निकित चौधरी याने ३१ चेंडूत ५८ धावा फटकावल्या. निकितने आपल्या बहारदार खेळीत चार उत्तुंग षटकार व पाच चौकार ठोकले. रोहन शहा याने २१ चेंडूत नाबाद ४२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने एक षटकार व सात चौकार मारले. निखिल कदम ६ धावांवर बाद झाला. गिरीश खत्री याने नाबाद ८ धावांचे योगदान दिले. जॉन्सन संघाकडून प्रवीण क्षीरसागर याने ३१ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला.
जॉन्सन संघासमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान होते. मात्र, या धावसंख्येचा पाठलाग करताना मासिया संघ १७.२ षटकात ६८ धावांत सर्वबाद झाला. मासिया संघाने १२८ धावांनी सामना जिंकला. प्रशांत राव (१६), पांडुरंग रोडगे (१८) या दोघांनाच धावांचा दुहेरी आकडा गाठता आला.
मासिया संघाकडून हितेश पटेल याने १८ धावांत तीन विकेट घेतल्या. वसीम मस्तान (२-९), मुकीम शेख (२-७), धर्मेंद्र वासानी (१-१३), अजिंक्य पाथ्रीकर (१-५), सुमित अग्रे (१-८) यांनी प्रभावी कामगिरी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुकीम शेख सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.