
नवी दिल्ली : आक्रमक फलंदाज ऋषभ पंत याने रणजी सामन्यात दिल्ली संघाचे कर्णधारपद भूषवण्यास स्पष्ट नकार दिला. पंतच्या निर्णयाने क्रिकेट विश्वाला आश्चर्यचकित केले आहे. युवा आयुष बदोनीला कर्णधारपदी कायम ठेवले पाहिजे असे पंतने सांगत एक वेगळे उदाहरण निर्माण केले.
रणजी ट्रॉफीमधील सामन्यांचा पुढचा टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ऋषभ पंत आता दिल्लीकडून देशांतर्गत सामने खेळताना दिसणार हे निश्चित झाले आहे. दिल्ली संघाचा पुढील सामन्यात सौराष्ट्र संघाशी होणार आहे. १७ जानेवारी रोजी डीडीसीए अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर ऋषभ पंतने दिल्ली संघाचे नेतृत्व करण्याची ऑफर नाकारल्याचे जाहीर करण्यात आले. पंतने स्वतः म्हटले आहे की, तरुण आयुष बदोनीला कर्णधारपदी कायम ठेवले पाहिजे. हे एखाद्या वरिष्ठ खेळाडूने स्वतः तरुण खेळाडूला कर्णधार म्हणून ठेवण्याचे समर्थन केल्याचे उदाहरण आहे.
गेल्या ७ वर्षात ऋषभ पंत पहिल्यांदाच रणजी सामना खेळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पंतने कर्णधारपद नाकारले आहे. कारण पंत हा दिल्ली संघाचा नियमित भाग नाही आणि व्यवस्थापनाला त्याच्यासाठी कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. पंतने त्याच्या कारकिर्दीत ५ टी २० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, याशिवाय त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याचा बराच अनुभव आहे. सौराष्ट्र संघाविरुद्धच्या सामन्यात ‘डीडीसीए’ला पंतच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा होता. परंतु पंतने कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे.
ऋषभ पंतने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण १५ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २१ डावांमध्ये १,२८७ धावा केल्या आहेत. तो रणजी ट्रॉफीमध्ये ६१.२९ च्या सरासरीने धावा करत आहे आणि त्याने चार शतके आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत.
आयुष बदोनी कर्णधार
सध्या २५ वर्षीय आयुष बदोनी रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. कारण दिल्लीने त्याच्या नेतृत्वाखाली नऊ पैकी सात सामने जिंकले आहेत. चालू हंगामात, दिल्लीला गट ड मध्ये स्थान देण्यात आले आहे आणि सध्या ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. जर आपण बदोनीच्या वैयक्तिक कामगिरीवर नजर टाकली तर, २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत चार डावात २९६ धावा केल्या आहेत.