कबड्डी स्पर्धेत पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

  • By admin
  • January 18, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

रविवारी रंगणार अंतिम सामन्याचा थरार 

बारामती : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील २३ व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात पुणे ग्रामीण आणि महिला गटामध्ये पुणे ग्रामीण संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात पुरूष विभागात बाद फेरीच्या झालेल्या पहिल्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई उपनगर पूर्व संघावर ४०-२० असा दणदणीत विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. हाफ टाइमला पुणे ग्रामीण संघाकडे २३-८ अशी चांगली आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या जीवन डोंबले, स्वप्नील कोळी व अजित चौहान यांच्या चढायांच्या जोरावर हा विजय सोपा झाला. त्यांना अनुज गावडेने केलेल्या पकडींची चांगली साथ मिळाली. पुणे ग्रामीण संघाने सुरवातीपासूनच सामन्यावर आपली पकड घट्ट केली होती. त्यामुळे मुंबई उपनगर पूर्वच्या खेळाडूंना सावरण्यास संधीच मिळाली नाही. मुंबई उपनगर पूर्वच्या आकाश रुदले याने काहीसा प्रतिकार केला. शिवांश गुप्ता याने पकडी केल्या.  

महिला विभागातील पहिल्या उपांत्य पूर्व फेरीच्या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने पुणे शहर संघावर २८-२३ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. हाफ टाइमला पुणे ग्रामीण संघ १०-१३ असा पिछाडीवर होता. मात्र पुणे ग्रामीणच्या अनुभवी प्रशिक्षक असलेल्या राजेश ढमढेरे यांच्या डावपेचांपुढे पुणे शहर संघाला पराभव पत्करावा लागला. पुणे ग्रामीण संघाच्या मंदिरा कोमकर चढाया व निकिता पडवळ हिने अष्टपैलू कामगिरी केली. त्यांनी अत्यंत सावध चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रेखा सावंत हिने उत्कृष्ट पकडी घेतल्या. पुणे शहर संघाच्या आम्रपाली गलांडे व अंकिता पिसाळ यांनी जोरदार प्रतिकार केला. मात्र त्यांना आपला पराभव टाळण्यात अपयश आले. सिद्धी मराठे हिने चांगल्या पकडी केल्या.      

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (१९ जानेवारी) रोजी संध्याकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभानंतर सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून महाराष्ट्रातील प्रादेशिक नृत्ये व संगीत याची मेजवानी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समिती मार्फत रोख पारितोषिक रक्कमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून सदर स्पर्धेमध्ये खेळाडूंना ४४.६० लाखांची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *