
उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा ५० गुणांनी धुव्वा; अंतिम फेरीत नेपाळशी सामना
बाळासाहेब तोरसकर

नवी दिल्ली ः इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठून एक नवा इतिहास लिहिला आहे. जागतिक खो-खो विश्वात सुवर्णाक्षरांनी कामगिरी नोंदवण्यासाठी भारतीय संघाला आता केवळ एक विजयाची गरज आहे. दुसरीकडे नेपाळ संघाने दोन्ही गटात अंतिम फेरी गाठली आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने कमालीच्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे भारताचे अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न सहज शक्य झाले. पहिल्या डावातच भारताने आपले इरादे दाखवून देत प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेला सळो की पळो करून सोडले. या सामन्यात दोन्ही डावात भारताने प्रत्येकी ५ असे १० ड्रीम रन गुण मिळवत दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. आज पुन्हा एकदा प्रियांका इंगळेने (४ गुण) खो-खो विश्वचषकाचे आम्हीच दावेदार आहोत हे दाखवून दिले. पंजाबचे राज्यपाल महामहीम गुलाबचंद कटारिया यांनी हा सामना पाहण्याचा आनंद लुटला. भारताने हा सामना ६६-१६ (मध्यंतर ३३-१०) असा ५० गुणांनी जिकला.
भारतीय संघाने सामन्याला दमदार सुरुवात केली. चैत्रा बी. यांच्या अद्वितीय ड्रीम रनमुळे संघाने पहिल्या टप्प्यात मजबूत पकड मिळवली. नाझिया बिबी आणि निर्मला भाटी यांना दक्षिण आफ्रिकेच्या बचावपटूंनी टिपल्यानंतरही चैत्राने एकटीने ५ गुण मिळवले. मात्र, अखेर सिनेतेंबा मोसिया यांनी तिला बाद केले. या ड्रीम रनने भारताने दक्षिण आफ्रिकेच्या ८ गुणांच्या जवळ जाण्याची तयारी केली.दुसऱ्या
दुसऱ्या टर्नमध्ये रेश्मा राठोड यांनी आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना बाद करण्यात मोठी कामगिरी केली. तिची ही कामगिरी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. या टर्ननंतर भारतीय संघ ३३-१० अशा आघाडीवर होता.
तिसऱ्या टर्नमध्ये भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ड्रीम रन साकारला. वैष्णवी पवार, नसरीन शेख, आणि भिलरदेवी यांनी सलग ५ मिनिटे मैदानावर उत्कृष्ट खेळ करत ५ गुण मिळवले. या टर्न नंतर स्कोअर ३८-१६ असा झाला, ज्यामुळे अंतिम सात मिनिटांमध्ये भारतीय संघाची पकड मजबूत झाली.
दक्षिण आफ्रिकन संघाच्या तुकड्यांनी चौथ्या टर्नमध्ये केवळ १ मिनिट ४५ सेकंद टिकाव धरला. नसरीन शेख (२.०५ मि. ८ गुण) आणि रेश्मा राठोड (६ गुण) यांनी शानदार खेळ करत सामना भारताच्या बाजूने ६६-१६ असा संपवला. आता भारतीय महिला संघ रविवारी (१९ जानेवारी) नेपाळविरुद्ध अंतिम लढतीसाठी मैदानात उतरणार आहे.
सामन्याचे पुरस्कार
– सर्वोत्तम आक्रमक : सिनेतेंबा मोसिया (दक्षिण आफ्रिका)
– सर्वोत्तम संरक्षक : निर्मला भाटी (६ गुण, भारत)
– सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू : वैष्णवी पवार (२.१५ मि. संरक्षण व ६ गुण, भारत)
नेपाळ दोन्ही गटात अंतिम फेरीत
महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात नेपाळने युगांडावर ८९-१८ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर पुरुष गटाच्या सामन्यात देखील नेपाळने इराणवर ७२-३० अशी मात केली. नेपाळने हाफ टाइमला ३५-८ अशी निर्विवाद आघाडी घेतली होती.