
नितीन चषक क्रिकेट स्पर्धा : मुकीम शेख, संदीप सहानी सामनावीर
सेलू : नितीन चषक क्रिकेट स्पर्धेत असरार इलेव्हन संभाजीनगर आणि यंग इलेव्हन संभाजीनगर या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यांमध्ये मुकीम शेख आणि संदीप सहानी यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

सेलू येथील नूतन महाविद्यालय मैदानावर ही स्पर्धा होत आहे. असरार इलेव्हन संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सहा बाद २१९ अशी भक्कम धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना आदर्श क्रिकेट क्लब संघ १५.३ षटकात १४६ धावांत सर्वबाद झाला. असरार इलेव्हनने हा सामना ७३ धावांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात मुकीम शेख (९४), अंकुश पासवान (४२) व रुषिकेश सोनवणे (३९) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. गोलंदाजीत मोहसीन खान (३-३५), प्रतीक भालेराव (३-२५) व यासीन शेख (३-३६) यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
दुसऱ्या सामन्यात यंग इलेव्हन संभाजीनगर संघाने १८.५ षटकात सर्वबाद ११८ असे माफक लक्ष्य उभारले. अल आरजी संभाजीनगर संघ १५.४ षटकात ११६ धावांत सर्वबाद झाला. अतिशय चुरशीचा झालेला हा सामना यंग इलेव्हन संघाने अवघ्या दोन धावांनी जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
या सामन्यात आसिफ खान (४९), अमित पाठक (२८), आकाश बोराडे (२२) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत रुषिकेश नायर (३-१२), संदीप सहानी (३-२०) व मोहम्मद इम्रान (२-१८) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत आपला ठसा उमटवला.
संक्षिप्त धावफलक : १) असरार इलेव्हन संभाजीनगर : २० षटकात सहा बाद २१९ (मुकीम शेख ९४, शेख सादिक १२, विनय कुंवर १५, अंकुश पासवान ४२, विकास वाघमारे नाबाद ३०, इतर २०, सईद जहागीरदार ३-३५, शेख आरिफ १-३६, गोपाळ गुरखुडे १-२०) विजयी विरुद्ध आदर्श क्रिकेट क्लब : १५.३ षटकात सर्वबाद १४६ (समीर काटकर २०, रुषिकेश सोनवणे ३९, देव नवले २८, मंदार काळे ८, मोहसीन खान १५, गोपाळ गुरखुडे ११, शेख आरिफ १३, यासीन शेख ३-३६, प्रतिक भालेराव ३-२५, विकास वाघमारे २-८, समाधान पांगारे १-१०, शेख सादिक १-१७). सामनावीर : मुकीम शेख.
२) यंग इलेव्हन संभाजीनगर : १८.५ षटकात सर्वबाद ११८ (अमित पाठक २८, स्वप्नील खडसे ६, स्वप्नील चव्हाण १५, हिंदुराव देशमुख ६, मधुर पटेल ७, सय्यद अब्दुल वाहिद १४, नितीन फोलाणे नाबाद २०, संदीप सहानी ६, रुषिकेश नायर ३-१२, इशांत राय २-३९, मोहम्मद इम्रान २-१८, आर्यन शेजूळ २-२०, अनिकेत काळे १-१५) विजयी विरुद्ध अल आरजी संभाजीनगर : १५.४ षटकात सर्वबाद ११६ (आसिफ खान ४९, आकाश बोराडे २२, अमान शेख ६, सुरज गोंड १०, इशांत राय १०, अनिकेत काळे नाबाद ५, संदीप सहानी ३-२०, हिंदुराव देशमुख २-४०, सय्यद अब्दुल वाहिद २-९, शुभम मोहिते १-२०, स्वप्नील चव्हाण १-२७). सामनावीर : संदीप सहानी.