विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिलांचा मोठा विजय

  • By admin
  • January 19, 2025
  • 0
  • 40 Views
Spread the love

सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजवर नऊ विकेटने मात 

क्वालालंपूर : १९ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजचा नऊ विकेट्सने पराभव करून आपल्या मोहिमेची सुरुवात दणदणीत विजयाने केली. 

रविवारी मलेशियातील क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने १३.२ षटकांत १० गडी गमावून केवळ ४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४.२ षटकांत फक्त एका गडी गमावून ४७ धावा केल्या आणि सामना नऊ विकेटने जिंकला. या सामन्यात भारताकडून पारुनिका सिसोदिया हिने तीन विकेट घेतल्या. तिने फक्त सात धावा दिल्या. या घातक गोलंदाजीसाठी पारुनिकाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी उत्कृष्ट होती. पारुनिका व्यतिरिक्त, व्हीजे जोशिता आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जोशिता हिने वेस्ट इंडिजचा कर्णधार समर रामनाथ (३) आणि अँन कंबरबॅच (०) यांना लागोपाठच्या  चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आयुषीने जहझारा क्लॅक्सटन (०) आणि क्रिस्टन सदरलँड (०) यांच्या विकेट घेतल्या. पारुनिकाने बी हरिचरण (०), के कासार (१५) आणि एस रॉस (०) यांचे बळीही घेतले. भारताच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा फलंदाजीचा क्रम पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला. त्याच्या नऊ खेळाडूंना दुहेरी अंकही गाठता आला नाही.

भारताने २६ चेंडूत लक्ष्य गाठले
प्रत्युत्तरात, भारतीय महिला संघाने केवळ २६ चेंडूत लक्ष्य गाठले. सलामीला फलंदाजी करताना गोंगडी त्रिशा हिने ४, जी कमलिनी हिने नाबाद १६ आणि सानिका चालके हिने नाबाद १८ धावा केल्या. वेस्ट इंडिज कडून जहज्राने एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *