
भारतीय महिला, पुरुष संघाने नेपाळला नमवून रचला नवा इतिहास
बाळासाहेब तोरसकर

नवी दिल्ली ः भारतीय महिला आणि पुरुष संघांनी पहिला खो-खो विश्वचषक जिंकून जगाच्या आणि भारतीय खो-खो खेळाच्या इतिहासात ऐतिहासिक यश संपादन केले. भारतीय संघाने दोन्ही गटात विश्वचषक जिंकून दुहेरी मुकुटासह एक नवा इतिहास रचला आहे. नेपाळ संघाला दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एकाच दिवसात भारतीय महिला व पुरुष संघाने विश्वचषक जिंकून देत देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला.

भारताच्या महिला संघांने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलांच्या सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला. महिलांच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला.
या सामन्यात भारताची कर्णधार प्रियंका इंगळे, रेश्मा राठोड, चैतरा बी. यांनी धमाकेदार कामगिरी नोंदवली. अंशू कुमारी ही सर्वोत्तम आक्रमक तर चैतरा बी ही सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. नेपाळची मनमती धानी सर्वोत्तम संरक्षक पुरस्काराची मानकरी ठरली.

या स्पर्धेत भारतीय महिला संघाने साखळी फेरीत दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर बांगलादेशवर उपांत्यपूर्व फेरीत आणि दक्षिण आफ्रिकेवर उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
भारतीय पुरुषांची जोरदार कामगिरी.
भारताने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करताना नेपाळला जरा सुध्दा डोकेवर काढायची संधी दिली नाही. पहिल्या टर्न मध्ये भारताने तब्बल चार तुकड्या बाद करून नेपाळला जोरदार धक्का दिला व या आक्रमणाच्या टर्नमध्ये भारताने २६-० असे गुण वसूल केले. त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक खेळत दबाव वाढवला. भारताने हा सामना ५४-३६ असा १८ गुणांनी जिंकत विश्वचषकावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात सुयश गरगटे (सर्वोत्तम आक्रमक, भारत), रोहित बर्मा (सर्वोत्तम संरक्षक, नेपाळ), आणि मेहूल (सर्वोत्कृष्ट खेळाडू, भारत) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण केंद्रीय मंत्री किरण रिजिजू , माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व विविध मान्यावरांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल व महासचिव महेंद्र सिंग त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव आदी उपस्थित होते.
कोट
सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी २ कोटी २५ लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच थेट क्लास वन अधिकारी म्हणून नोकरी देखील राज्य शासनाच्या वतीने दिली जाणार आहे.
– डॉ. चंद्रजीत जाधव, सहसचिव भारतीय खो-खो महासंघ.