
अंतिम सामन्यात डीव्हीसीए संघावर सात विकेटने विजय, नौशाद शेखची लक्षवेधक कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए सीनियर महा टी २० क्रिकेट स्पर्धेत सीओएम संघाने अंतिम फेरीत डीव्हीसीए संघावर सात विकेटने विजय नोंदवत विजेतेपद पटकावले.
एमसीए मैदान २ वर हा अंतिम सामना झाला. डीव्हीसीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १८.२ षटकात सर्वबाद ७४ असे माफक लक्ष्य उभारले. सीओएम संघाने १०.१ षटकात तीन बाद ७५ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला आणि विजेतेपद संपादन केले.
या सामन्यात देवद (३१), नौशाद शेख (२०), आदिल अन्सारी (१८) यांनी आपले योगदान दिले. गोलंदाजीत नौशाद शेख याने अवघ्या १४ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. सय्यद अतिफ जमाल (१-८) व सोहन जामाले (१-१३) यांनी विकेट घेतल्या.
एमसीए अपेक्स कौन्सिल सदस्य सुहास पटवर्धन यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विजेत्या संघाचा कर्णधार नौशाद शेख याने ट्रॉफी स्वीकारली.
संक्षिप्त धावफलक – डीव्हीसीए – १८.२ षटकात सर्वबाद ७४ (यश जगदाळे १३, ओम भोसले ७, तिलक जाधव १५, ओम भाबड ७, वैभव अगाम १२, ओमकार राजपूत १४, नौशाद शेख ५-१४, वैभव गोसावी १-१५, सय्यद अतिफ जमाल १-८, रोहन फंड १-२४, सिद्धेश वरघंटे १-५) पराभूत विरुद्ध सीओएम – १०.१ षटकात तीन बाद ७५ (देवद ३१, नौशाद शेख २०, आदिल अन्सारी नाबाद १८, विराज दरवटकर नाबाद ४, सोहन जामले १-१३, ओम भाबड १-२८, ओमकार राजपूत १-११).