तब्बल १७ वर्षांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबई संघाचे नेतृत्व करणार

  • By admin
  • January 20, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा रणजी सामना खेळणार

मुंबई ः बीसीसीआयने भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळण्याचा इशारा दिल्यानंतर आता भारतीय संघातील पाच स्टार क्रिकेटपटू रणजी सामन्यात खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तर तब्बल १७ वर्षांनंतर मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे.

प्रथम भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका गमावावी लागली. या दोन पराभवांमुळे भारतीय संघाला तीव्र टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटूंना रणजी ट्रॉफी खेळण्यास सांगितले. रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत भारतीय संघातील पाच स्टार क्रिकेटपटू खेळताना दिसतील.

रणजी ट्रॉफीचा पुढील टप्पा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. कर्णधार रोहित शर्मा, युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत रणजी सामना खेळताना दिसणार आहे. तर विराट कोहली आणि केएल राहुल रणजी ट्रॉफी सामना खेळणार नाहीत.

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांसारख्या भारतीय संघातील खेळाडूंनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात रणजी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तर विराट आणि राहुल वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनांमुळे त्यात खेळू शकणार नाहीत.

रोहित शर्मा इतिहास रचणार

चॅम्पियन्स ट्रॉफी संघाच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने स्वतः रणजी सामना खेळण्याची पुष्टी केली. रणजी सामन्यासाठी मैदानावर उतरताच तो इतिहास रचेल. खरं तर, १७ वर्षांनंतर एक भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफी सामना खेळणार आहे. मानेच्या दुखण्यामुळे विराट कोहली रणजीमध्ये सहभागी होणार नाही आणि कोपराच्या दुखण्यामुळे केएल राहुल सहभागी होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *