
लक्ष्य सेन, सिंधूच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा
जकार्ता : भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत वर्षातील त्यांचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सात्विक आणि चिरागची जोडी उत्तम फॉर्ममध्ये आहे. या स्टार जोडीने गेल्या दोन स्पर्धा, मलेशिया ओपन सुपर १००० आणि इंडिया ओपन सुपर ७५० च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सात्विक आणि चिराग दोघेही उपांत्य फेरीत सरळ सेटमध्ये पराभूत झाले आणि आता त्यांचे लक्ष्य स्पर्धेत आणखी पुढे जाण्याचे असेल.
भारतीय जोडी इंडोनेशिया मास्टर्समध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात चायनीज तैपेईच्या चेन झी-रे आणि यू चिह लिन यांच्याविरुद्ध करतील. त्याच वेळी, लक्ष्य सेन हंगामाची निराशाजनक सुरुवात मागे टाकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. भारताच्या एकेरी खेळाडू सेन आणि पी व्ही सिंधूसाठी हे सोपे आव्हान नसेल. गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या २३ वर्षीय सेनला गेल्या दोन स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता आणि तो येथे त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करेल.
आणखी एक भारतीय खेळाडू प्रियांशु राजावत देखील मुख्य फेरीत आपले आव्हान सादर करेल. त्याचा पहिला सामना जपानच्या कोडाई नारोका विरुद्ध असेल. पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीत किदाम्बी श्रीकांत आणि किरण जॉर्ज हे दोन भारतीय खेळाडू एकमेकांसमोर येतील. महिला एकेरीच्या ३२ व्या फेरीत, सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात चिनी तैपेईच्या सुंग शुओ युनविरुद्ध करेल. त्यांच्याशिवाय, आकर्शी कश्यपचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होईल आणि अनुपमा उपाध्यायचा सामना स्थानिक खेळाडू ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगशी होईल.
सिंधू देखील प्रभावित करण्यास उत्सुक असेल.
इंडिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव झाला आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती भारतीय स्टार येथे त्याची भरपाई करण्यास उत्सुक असेल. महिला एकेरीच्या पात्रता फेरीत, ईशाराणी बरुआचा सामना देशाच्या रक्षिता रामराजशी होईल तर तान्या हेमंतची लढत चायनीज तैपेईच्या तुंग सिउ-टोंगशी होईल. तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनप्पा या त्यांच्या महिला दुहेरी मोहिमेची सुरुवात थायलंडच्या ऑर्निचा जोंगसाथापोर्नपर्न आणि सुकिता सुवाचाई यांच्याविरुद्ध करतील.