
विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रिक घेणारी पहिली गोलंदाज, भारताचा मलेशियावर दहा विकेटने विजय
कोलालंपूर : १९ वर्षांखालील महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा हिने एक नवा इतिहास घडवला. पहिल्याच सामन्यात खेळताना वैष्णवीने हॅटट्रिक नोंदवली. तसेच वैष्णवीने पदार्पणातच पाच विकेट घेत सामनावीर किताब देखील पटकावला. वैष्णवीच्या धमाकेदार कामगिरीमुळे गतविजेत्या भारतीय संघाने मलेशिया संघावर दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा मोठा विजय आहे.
१९ वर्षांखालील महिला विश्वचषकात भारतासाठी हॅटट्रिक घेणारी वैष्णवी शर्मा ही पहिली गोलंदाज ठरली. मलेशियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील १६ व्या सामन्यात वैष्णवीने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मलेशिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि फक्त ३१ धावांवर सर्वबाद झाला. वैष्णवी शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्यात शानदार हॅटट्रिकचा समावेश होता. पहिल्या डावातील १४ व्या षटकात वैष्णवीने हॅटट्रिक घेण्याचा अद्भुत पराक्रम केला.
वैष्णवीच्या हॅटट्रिक ओव्हरचा पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर, पुढच्या तीन चेंडूंमध्ये वैष्णवीने नूर ऐन बिंती रोसलान (३), नूर इस्मा डानिया (०) आणि सिती नजवाह (०) यांना बाद केले. नूर ऐन बिंटी रोसलान आणि नूर इस्मा डानिया यांना वैष्णवी शर्माने पायचीत बाद करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याशिवाय वैष्णवीने सती नजवाहला बाद करून पाचवा बळी घेतला. वैष्णवीला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.
भारताचा १० विकेट्सने विजय
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मलेशियाचा संघ १४.३ षटकांत फक्त ३१ धावांवर बाद झाला. या काळात संघाचा कोणताही फलंदाज दुहेरी अंकाचा टप्पा गाठू शकला नाही. संघासाठी नुनी फारिनी सफ्री आणि कर्णधार नूर डानिया स्याहदा यांनी ५-५ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. या काळात भारताकडून वैष्णवी शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय आयुषी शुक्लाने ३ आणि जोशिता व्हीजेने १ विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकही विकेट न गमावता फक्त २.५ षटकांत ३२ धावा करून सामना जिंकला. यादरम्यान, संघाकडून गोंगाडी त्रिशाने १२ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद २७ धावा काढल्या आणि जी कमलिनीने ५ चेंडूत १ चौकारासह नाबाद ४ धावा काढल्या.