
ईशानी वर्माचे नाबाद अर्धशतक
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत जालना महिला संघाने लातूर महिला संघाचा २६ धावांनी पराभव केला. ईशानी वर्मा हिने नाबाद ६१ धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
धानोरी येथे झालेल्या या सामन्यात जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात पाच बाद १२२ धावसंख्या उभारली. जालना संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. श्रावणी दसगुडे (०), संस्कृती शेवाळे (१), रुशिता जंजाळ (०), मीना गुरवे (५) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. जालना संघ मोठ्या अडचणीत सापडला. त्यावेळी ईशानी वर्मा हिने ५३ चेंडूत नाबाद ६१ धावांची खेळी करुन डावाला आकार दिला. जितेश्री दामले हिने १८ चेंडूत ३३ धावा फटकावत संघाची स्थिती भक्कम केली.
लातूर महिला संघाकडून ऐश्वर्या चेवाळे हिने सहा धावांत दोन गडी बाद केले. प्रांजल पवार (१-२१) व आरोही सुरवसे (१-२५) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लातूर महिला संघासमोर विजयासाठी १२३ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना लातूर महिला संघ १५ षटकात चार बाद ९६ धावा काढण्यात यशस्वी ठरला. जालना संघाने २६ धावांनी सामना जिंकला. यात गार्गी जुवेकर हिने सर्वाधिक नाबाद ४४ धावा फटकावत एकाकी झुंज दिली. प्रांजल चेवाळे हिने नाबाद २७ धावा काढल्या.
जालना महिला संघाकडून मीना गुरवे हिने २२ धावांत दोन विकेट घेतल्या. रुही सिंग (१-१४) व तन्वी पाटील (१-७) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.