
पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या आयोजित पीडीसीसी १३, १५, १९ वर्षांखालील मुले व मुली निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत निहीरा कौल, कुशाग्र जैन, सुयोग वडके, तन्वी कुलकर्णी यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत १५ वर्षांखालील खुल्या गटात आठव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत कुशाग्र जैन याने अयान सोमाणीचा पराभव करून ८ गुणांसह विजेतेपद पटकावले. कुशाग्र याने रेटी पद्धतीने डावास सुरुवात केली व ३० चालीमध्ये विजय मिळवला. याच गटात भुवन शितोळेने रेयांश झडचा पराभव करून ७ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. सृजन बोरकरने आरव मेहताचा पराभव करून ६.५ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.
१५ वर्षांखालील मुलींच्या गटात सहाव्या फेरीत निहीरा कौलने गेहणा शिंगवीला नमवून ५.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. निहिरा हिने फ्रेंच डिफेन्स पद्धतीने डावास सुरुवात केली व ४० चालीमध्ये गेहणावर विजय मिळवला. सई पाटीलने ५ गुणांसह दुसरे, तर प्रतिती खंडेलवाल हिने ४ गुण व २३.५ बुकोल्स सरासरीच्या जोरावर तिसरे स्थान पटकावले.
१९ वर्षांखालील खुल्या गटात सहाव्या फेरीत सुयोग वडकेने अक्षय जोगळेकर याला बरोबरीत रोखले व ५ (२३ बुकोल्स) गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. हितांश जैन हिने ५ गुण व २२.५ बुकोल्स सरासरीच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला. याच मुलींच्या गटात पाचव्या फेरीत तन्वी कुलकर्णी हिने मृण्मयी बागवेचा पराभव करून ५ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कुंटे चेस अकादमीच्या संचालिका मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, आयए राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक प्रकाश कुंटे, चीफ आर्बिटर नितीन शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते.