गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, नवोदित संघांनी जिंकला चिंतामणी चषक 

  • By admin
  • January 22, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

प्रफुल्ल कदम, अर्जुन कोकरे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू 

मुंबई : गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, नवोदित संघ यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष प्रथम श्रेणी व कुमार गट कबड्डी स्पर्धचे विजेते ठरले. 

नवोदित संघाचे या महिन्यातील हे सलग दुसरे जेतेपद. गुड मॉर्निंग संघाचा प्रफुल्ल कदम पुरुष प्रथम श्रेणीत, तर नवोदित संघाचा अर्जुन कोकरे कुमार गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख पाच हजार आणि सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. 

चिंचपोकळी मुंबई येथील सदगुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर झालेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग संघाने लायन्स स्पोर्ट्स संघाचा प्रतिकार ३८-२७ असा मोडून काढत रोख  ३५ हजार व चिंतामणी चषकावर आपले नाव कोरले. उपविजेत्या लायन्सला रोख ३० हजार व चिंतामणी चषकावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघांनी सुरुवात संथ खेळाने केली. पहिल्या डावात दोन्ही संघांनी एक – एक लोण देत गुणफलक हलता ठेवला. विश्रांतीला १५-१४ अशी आघाडी गुड मॉर्निंग संघाकडे होती. दुसऱ्या डावात मात्र गुड मॉर्निंगच्या प्रफुल्ल कदम, तन्मय सावंत, साहिल राणे यांनी आपला खेळ अधिक गतिमान करीत लायन्स संघावर लोण देत व एक अव्वल पकड घेत आपली आघाडी वाढविली. शेवटी ११ गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. लायन्सच्या ऋषिकेश कनेरकर, हर्ष मोरे, बाजीराव होडगे यांना पहिल्या डावातील खेळाचे सातत्य न राखता आल्याने पराभवाचा सामना करावा लागला.

कुमारांच्या अंतिम सामन्यात नवोदित संघाने पूर्वार्धातील १७-२१ अशा ४ गुणांच्या पिछाडीवरून शिवमुद्रा प्रतिष्ठान संघाचे आव्हान ४६-३० असे हाणून पाडत रोख पंधरा हजार व चिंतामणी चषक आपल्याकडे खेचून आणला. उपविजेत्या शिवमुद्राला रोख दहा हजार व चिंतामणी चषकावर समाधान मानावे लागले. 
शिवमुद्राच्या अर्णव हटकर, विशाल लाड यांनी योजना पूर्वक खेळ करीत पहिल्या डावात लोण देत २१-१७ अशी आघाडी राखण्यात यश मिळविले होते. पण दुसऱ्या डावात मात्र ते ढेपाळले. नवोदितच्या अथर्व सुवर्णा, अर्जुन कोकरे, सिद्धेश पाटील यांनी दुसऱ्या डावात झंजावाती खेळ करीत शिवमुद्रावर ३ लोण देत आपला विजय सोपा केला. याच महिन्यात शिवमुद्रा संघाला सलग दुसऱ्यांदा पहिल्या डावात आघाडी घेऊन पराभवाचा सामना करावा लागला. 

प्रथम श्रेणी गटात उपांत्य उपविजयी ठरलेल्या जय भारत आणि गोलफादेवी यांना प्रत्येकी रोख दहा हजार व चषक तसेच कुमार गटात उपांत्य उपविजयी ठरलेल्या हिंदमाता, अमर यांना देखील प्रत्येकी रोख पाच हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. जय भारतचा हर्ष मोरे पुरुषांत, तर शिवमुद्राचा विशाल लाड कुमार गटात स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे खेळाडू ठरले. गुड मॉर्निंग संघाचा नंदिश बेर्डे पुरुष गटात, तर नवोदित संघाचा ऋषिकेश माळवी कुमार गटात स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे खेळाडू ठरले. या सर्वाँना प्रत्येकी रोख दोन हजार पाचशे व सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले.

लालबागच्या राजाचे सचिव सुधीर भाऊ साळवी, राजेंद्र लांजवळ, राजेंद्र कोतवडेकर, सतीश खणकर, संजोग खामकर तसेच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *