
बजाजनगर क्रीडा मंडळातर्फे महिला क्रिकेटपटूंचा सत्कार
चॅरिटी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : पुणे येथे चॅरिटी प्रीमियर लीग सीझन ७ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या महिला संघाने तृतीय क्रमांक मिळवत स्पर्धा गाजवली.
धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या महिला क्रिकेट संघाचे बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने क्रीडा मंडळाचे सचिव व मुख्य प्रशिक्षक भीमराज पाटील रहाणे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक विनोद माने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
धर्मादाय सह आयुक्त कार्यालय महिला क्रिकेट संघात प्रणिती श्रीनिवार (उपकर्णधार), मोनिका शेळके (कर्णधार), मनीषा अमृतकर, सपना थोरवे, मनीषा देशमुख, वैशाली गवई, विद्या रोडे, शोभना महाजन, वृषाली जाधव, शारदा भारसाकळे, छाया पाईकराव आणि चेतना माळुंदे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघात बहुतांश महिला खेळाडू या अष्टपैलू असल्याने या संघाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
बजाजनगर क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी श्रीनिवास नंदमुरी, मनोहर देवानी, अनिल पवार, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, नामदेव दौड, अभिजीत दळवी, ॲड. ज्योती थोरात यांनी महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.