
छत्रपती संभाजीनगर : अंधेरी (मुंबई) येथे इंडियन गेन्सेरियू कराटे दो फेडेरेशन व इंडियन मार्शल आर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई ओपन कराटे स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
अंधेरी येथील राजे शहाजी क्रीडा संकुल येथे मुंबई ओपन कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य अशी १३ पदके जिंकली आहेत.
या स्पर्धेत विरम देवरा, काव्या भुसारी, पृथा दोडिया, धनश्री शेंडे, प्राची तारू आणि स्वरांजली येलपल्ले यांनी सुवर्णपदक पटकावले. तसेच मृण्मयी वाढेकर, युवराज खैरे आणि रिद्धी सोमवंशी या खेळाडूंनी रौप्य पदकाची कमाई केली. अनन्या कोळी, सृष्टी जगताप, भाऊसाहेब घुगे आणि ओंकार मुळे यांनी कांस्य पदक संपादन केले.
या घवघवीत यशाबद्दल कराटे संघटनेचे अरुण भोसले, बळीराम राठोड, मुकेश बनकर, विजय टकले, कैलास जाधव, जितू चंदनसे, नितीन चव्हाण, क्रांतिश्वर बनकर, सचिन काळे, महेश गायकवाड, अक्षय सोनवणे, गणेश वास्कर आदींनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.