
धुळे : तामिळनाडू येथे नुकत्याच झालेल्या ६८व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघाने राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ अशा बलाढ्य संघाना पराभूत करत रौप्य पदक प्राप्त केले आहे. राज्य क्रीडा मार्गदर्शक मुद्रा अग्रवाल यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या समवेत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश क्षत्रिय यांनी जबाबदारी सांभाळली.
या स्पर्धेसाठी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे व क्रीडा अधिकारी एम के पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रेखा पाटील, स्वप्नील बोधे, श्वेता गवळी, योगेश्वरी मिस्तारी व इतर प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांनी प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिरासाठी धुळे जिल्हा कार्यालयाचे गौरव परदेशी, योगेश देवरे, योगेश पाटील, ज्ञानेश्वर जाधव यांचे सहकार्य लाभले आहे.