
रितेश जाधव, विजय शिंदे, संपदा मोरे यांना पुरस्कार; रविवारी पुरस्कारांचे वितरण
धाराशिव : धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सन २०२३-२४ या वर्षीची जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात रितेश रमेश जाधव यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, विजय जयराम शिंदे आणि संपदा लहू मोरे यांना गुणवंत खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.

धाराशिव जिल्हयातील गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांचे करिता शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे प्रति वर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो.
जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्यासह क्रीडा उपसंचालक (लातूर), शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ चंद्रजित जाधव, राजकुमार सोमवंशी, प्रवीण बागल, जिल्हा क्री़डा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीचे सचिव श्रीकांत हरनाळे यांचा समावेश आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण रविवारी (२६ जानेवारी) पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या समारंभ कार्यक्रमात होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांची उपस्थिती असणार आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व १० हजार रुपये रोख असा पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी सांगितले आहे.