
रौप्य महोत्सवी क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या दोन संघात होणार विजेतेपदाचा सामना
गणेश माळवे
सेलू : नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत असरार इलेव्हन संभाजीनगर आणि यंग इलेव्हन संभाजीनगर या संघांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ही रौप्य महोत्सवी क्रिकेट स्पर्धा होत आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात प्रिन्स बिल्डर मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात सर्वबाद १२० धावसंख्या उभारली. असरार इलेव्हन संभाजीनगर संघाने १४ षटकात चार बाद १२३ धावा फटकावत शानदार सहा विकेटने विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात विराज जाधव (५४), मुकीम शेख (५१) यांनी आक्रमक अर्धशतके ठोकत मैदान गाजवले. प्रवीण देशेट्टी याने २७ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत विकास वाघमारे याने २२ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. समाधान पांगारे याने ११ धावांत तीन गडी टिपले. आकाश शर्मा याने १८ धावांत दोन गडी बाद केले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात यंग इलेव्हन संभाजीनगर संघाने इम्रान लातूर संघाचा तीन गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. इम्रान लातूर संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात आठ बाद १८८ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. यंग इलेव्हन संभाजीनगर संघाने २० षटकात सात बाद १८९ धावा फटकावत तीन विकेटने रोमांचक सामना जिंकला आणि दिमाखाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात हिंदुराव देशमुख (६५), सौरभ शेवाळकर (४७) व आशिष सूर्यवंशी (४२) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. गोलंदाजीत धीरज बहुरे याने २७ धावांत पाच विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ऋषभ करवा याने २९ धावांत चार गडी बाद केले. अमित पाठक याने २४ धावांत दोन बळी घेतले.
प्रतिक्रिया
रौप्य महोत्सवी वर्ष मोठे समाधान देणारे
नितीन कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या नितीन चषक स्पर्धेस यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.रौप्य महोत्सव वर्ष खरोखरच मनाला समाधान देणारे आहे. नितीन क्रीडा मंडळाच्या नितीन चषक स्पर्धेत रणजी खेळणाऱ्या खेळाडूंसह ग्रामीण भागातील खेळाडू खेळतात आणि चमकदार कामगिरी नोंदवतात याचे मोठे समाधान वाटते. मंडळाचे सर्व पदाधिकारी, कै. गिरीश लोडाया, गणेश माळवे यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे. क्रिेकेट चाहत्यांचा मोठा प्रतिसाद हा या स्पर्धेचे मोठे वैशिष्ट्य आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही या स्पर्धेचे २५ वर्षे पूर्ण करू शकलो आहे. भविष्यामध्ये नितीन क्रीडा मंडळाचे खेळाडू निश्चितपणे राज्य पातळीवर खेळतील असा विश्वास आहे.
- हरीभाऊ काका लहाने, अध्यक्ष, नितीन क्रीडा मंडळ.
……………
स्टेडियम उभारण्यासाठी जमीन देण्यास तयार
नितीन चषक क्रिकेट स्पर्धा २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्य क्रिकेट स्पर्धेमध्ये रणजी खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या स्पर्धेतून भविष्यात परभणी जिल्हा व तालुक्यातील खेळाडू खेळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. नितीन क्रीडा मंडळाच्या वतीने एमसीए क्रिकेट असोसिएशनला आम्ही जमीन देण्यास तयार आहोत. तरी त्यांनीही पुढाकार घेऊन या ठिकाणी स्टेडियम उपलब्ध करून द्यावे.
- संदीप लहाने, संयोजक, नितीन चषक क्रिकेट स्पर्धा.
…..
२५ वर्षांत स्पर्धेची मोठी झेप
नितीन चषक ही स्पर्धा गेल्या पंचवीस वर्षांपासून चालू आहे आणि त्याचे श्रेय हरिभाऊ काका लहाने व सर्व पदाधिकाऱ्यांना आहे. या स्पर्धेसाठी मी सुरुवातीची पाच वर्षे येत होतो. संदीप लहाने हे माझ्याकडे प्रशिक्षणासाठी मुंबईला येत होते तर सुरुवातीची तीन-चार वर्ष आम्ही चॅम्पियन झालो. त्यानंतर कौटुंबिक कारणाने या स्पर्धेत खेळण्यासाठी येणे बंद झाले. काकांची माझी मैत्री बरीच वर्षांची आहे. संदीप लहाने यांनी अकॅडमी चालू केली आहे. त्या अकॅडमीच्या धर्तीवर इथे चांगल्या टीम तयार झाल्या आहेत. २५ वर्षांत या स्पर्धेने मोठी प्रगती केली आहे. आणि पुढच्या वर्षी आम्हाला इथे यायचे आहे. रौप्य महोत्सवी वर्षा बद्दल मंडळाच्या सर्वांना शुभेच्छा.
- अनिल सावंत, मुंबई संघ प्रशिक्षक.