
पहिला टी २० सामना जिंकून भारतीय संघाची मालिकेत १-० ने आघाडी
कोलकाता ः अभिषेक शर्माच्या वादळी ७२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या टी २० सामन्यात इंग्लंड संघाचा सात विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारताने पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला १३२ धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाने १३३ धावांचे लक्ष्य १२,५ षटकात गाठले. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने डावाची सुरुवात धमाकेदार केली. खास करुन संजू सॅमसन याने गस एॅटकिन्सन याच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली. त्याने २२ धावा दिल्या. त्यामुळे बटलर याने त्याला दुसरे षटक दिले नाही. ४.२ षटकात भारताच्या सलामी जोडीने ४१ धावा फटकावल्या. संजू २० चेंडूत २६ धावा काढून बाद झाला. त्याने एक षटकार व चार चौकार मारले. त्यानंतर अभिषेक शर्मा नावाचे वादळ इडन गार्डन्स मैदानावर आले. अभिषेक याने वादळी फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ७९ धावा फटकावत संघाचा विजय निश्चित केला. अभिषेकने आठ उत्तुंग षटकार व पाच चौकार ठोकले.
कर्णधार सूर्यकुमार यादव एक खराब फटका मारून शून्यावर बाद झाला. तिलक वर्मा याने तीन चौकारांसह नाबाद १९ धावा काढल्या. हार्दिक पांड्या ३ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून आर्चर याने २१ धावांत दोन गडी बाद केले. आदिल रशीदने २७ धावांत एक बळी मिळवला.
इंग्लंड सर्वबाद १३२ धावा
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सर्वबाद केवळ १३२ धावा केल्या. इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा कर्णधार जोस बटलरने काढल्या. त्याने ४४ चेंडूत ६८ धावा फटकावत डाव सावरला. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट घेत इंग्लंडची दाणादाण उडवून दिली. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय प्रभावी ठरला कारण इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर फिल साल्ट आणि बेन डकेट हे १७ धावांच्या आत तंबूत परतले. कर्णधार जोस बटलरने एकाकी झुंज देत ६८ धावा करत आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. शेवटच्या षटकांमध्ये आदिल रशीद आणि जोफ्रा आर्चर यांनी मिळून २१ धावा केल्या आणि इंग्लंडचा धावसंख्या १३० धावांच्या पुढे नेली. इंग्लंडचा डाव १३२ धावांवर संपुष्टात आला.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने १४ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. मात्र, या सामन्यात शमीला खेळवण्यात आले नाही. या निर्णयाची बरीच चर्चा रंगली होती. दुसरा टी २० सामना चेन्नई येथे २५ जानेवारी रोजी होणार आहे.