
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे छत्रपती संभाजीनगर शहरात आगामी काही दिवसांत तीन राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात अंडर १९ सॉफ्टबॉल, लॉन टेनिस आणि अंडर १४ सॉफ्टबॉल अशा तीन स्पर्धांचा समावेश आहे.
विभागीय क्रीडा संकुल येथे या तीनही राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्पर्धा नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी दिली.
अंडर १९ मुले-मुली राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेला गुरुवारी सुरुवात झाली. ही स्पर्धा २७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत अंडर १७ मुले राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे. अंडर १४ मुले-मुली राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होईल. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होणार आहे, असे बाजीराव देसाई यांनी सांगितले. भारतीय शालेय क्रीडा महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यनेने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.