
१० वर्षांनंतर रणजी सामना खेळताना तीन धावांवर बाद
मुंबई : तब्बल दहा वर्षांनी रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फलंदाजीत अपयशी ठरला. जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध सुरू असलेल्या रणजी सामन्यात रोहित केवळ ३ धावा काढून बाद झाला. फलंदाजीतील रोहितची अपयशी मालिका कायम राहिल्याने क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.
शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मैदानावर हा सामना होत आहे. रोहित शर्मा याने १९ चेंडूंचा सामना केल्यानंतर फक्त ३ धावा काढून बाद झाला. अशाप्रकारे रोहित १० वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यात अपयशी ठरला. त्याने यापूर्वी २०१५ मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. त्यामध्ये त्याने शतक झळकावले होते. आता रोहितच्या खराब कामगिरीनंतर चाहते त्याला खूप ट्रोल करत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत फक्त ३१ धावा काढल्यानंतर रोहित शर्मा टीकेला सामोरे जात आहे. खराब कामगिरीमुळे चाहते रोहित शर्माला निवृत्तीचा सल्ला देत आहेत. दरम्यान, फॉर्ममध्ये परतल्यामुळे त्याला रणजी ट्रॉफी सामने खेळण्याचे आदेश मिळाले. परंतु रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी पहिला सामना खेळण्यासाठी आलेल्या रोहितची फलंदाजी अपयशी ठरली.
जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने यशस्वी जैस्वालसोबत मुंबईकडून डावाची सुरुवात केली. १९ चेंडूंचा सामना करताना रोहितला मैदानावर धावा काढण्यात अडचण येत होती आणि जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज उमर नझीरच्या गोलंदाजीवर पी के डोग्रा याने त्याला झेलबाद केले.
रोहित पहिला रणजी हंगाम
रोहित शर्माने २००६-७ च्या हंगामात ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध पहिला रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने एकदा फलंदाजी केली आणि रोहितने ४८ चेंडूत २१ धावा केल्या. रोहितने त्याच्या पहिल्या रणजी सामन्यात ९ षटके टाकली. त्याचा पहिला सामना अनिर्णित राहिला. त्याच्या पहिल्या पदार्पणाच्या हंगामात, रोहितने एकूण ८ सामने खेळले, ज्यात एक शतक होते. त्याने ८ सामन्यांमध्ये फलंदाजीने ५३१ धावा केल्या.