भारताचे स्टार फलंदाज रणजी सामन्यात फ्लॉप

  • By admin
  • January 23, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर यांच्या खराब फॉर्मने चिंतेत भर 

मुंबई : बीसीसीआयच्या कडक तंबीनंतर रणजी क्रिकेट सामने खेळण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय संघातील अनेक दिग्गज कलामीचे अपयशी ठरले. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांची खराब फलंदाजी कायम राहिली. 

भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या फॉर्मच्या शोधात आहे. त्यासाठी रोहितने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. जवळजवळ १० वर्षांनी रणजीमध्ये परतल्यानंतरही रोहित अपयशी ठरला. जवळपास एक दशकानंतर रणजी ट्रॉफी सामना खेळणारा रोहित मुंबईच्या जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात फक्त तीन धावा करून बाद झाला. उमर नझीरच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. डोग्रा याने त्याचा झेल घेतला. रोहित १९ चेंडू खेळू शकला. फक्त रोहितच नाही तर यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे असे दिग्गज फलंदाज देखील फ्लॉप ठरले. दुसरीकडे, पंजाब आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात शुभमन गिल आणि दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात ऋषभ पंत हे देखील अपयशी ठरले.

न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहितची बॅट कमालीची शांत राहिली आणि सहा डावांमध्ये रोहित फक्त ९३ धावा करू शकला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित पाच डावांमध्ये फक्त ३१ धावा करू शकला. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी फॉर्ममध्ये परतण्यासाठी रोहितने रणजीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०१५ नंतर रोहित पहिल्यांदाच रणजी सामना खेळला, पण इथेही तो अपयशी ठरला. आता दुसऱ्या डावात त्याच्याकडून धावा होण्याची अपेक्षा असेल.

यशस्वी जैस्वाल

रोहित व्यतिरिक्त सलामीवीर यशस्वी जैस्वाल देखील अपयशी ठरला. आठ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने चार धावा काढून यशस्वी बाद झाला. त्याला आकिब नबीने पायचीत बाद केले. अजिंक्य रहाणे १७ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने १२ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. उमर नझीरने त्याला क्लीन बोल्ड केले. श्रेयस अय्यर याने सात चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११ धावा काढल्या आणि तो बाद झाला. युधवीर सिंगच्या गोलंदाजीवर उमर याने त्याला झेलबाद केले. तर, शिवम दुबेला खाते उघडता आले नाही. रोहित, यशस्वी आणि श्रेयसच्या अपयशामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. हे तिघेही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. त्या मालिकेतही रोहित कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळेल. तथापि, भारताच्या मोहिमेसाठी रोहितच्या बॅटने चांगली कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर त्याने धावा केल्या तर भारताला चांगली सुरुवात मिळेल.

शुभमन गिल आणि पंत एक धाव करून बाद झाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितसोबत शुभमन गिल सलामीला येऊ शकतो. रोहित आणि यशस्वी व्यतिरिक्त, ऋषभ पंत आणि शुभमन गिल देखील रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. पंत दिल्ली संघाचा भाग आहे आणि गिल पंजाब संघाचा भाग आहे. कर्नाटक विरुद्ध पंजाबच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिल फक्त चार धावा करून बाद झाला. त्याने आठ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारला. तर, दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात पंत फक्त एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग आहे. पंतला १० चेंडूत एक धाव काढता आली. धर्मेंद्रसिंग जडेजाच्या चेंडूवर प्रेरक मंकड याने त्याला झेलबाद केले. तथापि, सौराष्ट्राचा रवींद्र जडेजा या सामन्यात निश्चितच चमकला आणि त्याने आतापर्यंत दिल्लीच्या दोन विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाने सनत सांगवान आणि यश धुल यांना बाद केले.

खराब फॉर्म कायम 

रोहित शर्मा : ३ धावा

शुभमन गिल : ४ धावा

ऋषभ पंत : १ धाव

श्रेयस अय्यर : ११ धावा

यशस्वी जैस्वाल : ४ धावा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *