
श्रीलंका संघाला ६० धावांनी नमवले सुपर सिक्स गटात प्रवेश
कौलालंपूर : गतविजेत्या भारतीय १९ वर्षांखालील महिला संघाने श्रीलंका संघाचा ६० धावांनी पराभव करुन विश्वचषक अंडर १९ महिला क्रिकेट स्पर्धेची सुपर सिक्स गटात प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे.
भारतीय संघाच्या विजयात गोंगाडी त्रिशा हिच्या ४९ धावांच्या खेळीचा मोलाचा वाटा राहिला. त्रिशाच्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघ ११८ धावांचे लक्ष्य उभारू शकला. श्रीलंकेचा संघ फक्त ५८ धावांत गडगडला. भारताने ६० धावांनी सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून ११८ धावा केल्या. त्रिशा आणि कमलिनी यांनी डावाची सुरुवात केली. पण कमलिनी काही खास करू शकली नाही. ती ५ धावा करून बाद झाली. तर त्रिशाने एक शानदार खेळी केली. तिने ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४९ धावा केल्या. सानिका चालके हिला खातेही उघडता आले नाही. कर्णधार निक्की प्रसाद ११ धावा करून बाद झाली. तिने २ चौकार मारले. मिथिला विनोदने १६ धावांचे योगदान दिले. तर जोशिथाने १४ धावा केल्या.
श्रीलंकेचा डाव गडगडला
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील महिला संघाला फक्त ५८ धावा करता आल्या. सलामीवीर संजना ५ धावा करून बाद झाली. निसंसाला खातेही उघडू शकले नाही. कर्णधार मनुदी नानायक्कारा २ धावा करून बाद झाली. हिरुणी हंसिका देखील २ धावा करून बाद झाली. या काळात शबनमने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत ९ धावा देत २ बळी घेतले. पारुनिका आणि जोशिता यांनीही प्रत्येकी २ विकेट घेतल्या. आयुषी शुक्लाने एक विकेट घेतली.
सलग तिसरा विजय
भारताने २०२५ च्या महिला १९ वर्षांखालील टी २० विश्वचषकात सलग तिसरा विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. भारताने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. यानंतर त्यांनी मलेशियाचा १० विकेट्सने पराभव केला. आता भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला आहे.