रोमांचक विजयासह श्रुती इंडस्ट्रीज, डॉक्टर इलेव्हन उपांत्य फेरीत 

  • By admin
  • January 23, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : योगेश चौधरी, डॉ गिरीश गाडेकर सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत श्रुती इंडस्ट्रीज आणि डॉक्टर इलेव्हन या संघांनी चमकदार  विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यांमध्ये योगेश चौधरी आणि डॉ. गिरीश गाडेकर यांनी सामनावीर किताब संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रुती इंडस्ट्रीज संघाने एनआरबी संघाचा रोमांचक सामन्यात चार धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात श्रुती इंडस्ट्रीज संघाने प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्वबाद १२१ असे माफक लक्ष्य उभे केले होते. मात्र, एनआरबी संघ १९.५ षटकात ११७ धावांवर सर्वबाद झाला. श्रुती इंडस्ट्रीज संघाने रोमहर्षक लढत केवळ चार धावांनी जिंकून आगेकूच केली.

या सामन्यात शशिकांत पवार याने ५१ चेंडूत ५९ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने तीन टोलेजंग षटकार व तीन चौकार  ठोकले. योगेश चौधरी याने अवघ्या २६ चेंडूत ४८ धावांची वादळी खेळी साकारली. योगेशने तीन उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. संदीप राठोडने दोन षटकारांसह १३ धावा फटकावल्या. गोलंदाजीत नितीन चव्हाण (३-२५), स्वप्नील मोरे (३-२४) व विनोद लंबे (३-२४) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

दुसऱ्या सामन्यात डॉक्टर इलेव्हनने महावितरण संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महावितरण संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार बाद १५३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना डॉक्टर इलेव्हनने १७.३ षटकात तीन बाद १५४ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला. या दणदणीत विजयासह डॉक्टर इलेव्हनने उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात गिरीश गाडेकर याने ४२ चेंडूत ६५ धावांची धमाकेदार खेळी साकारली. गाडेककर याने दोन उत्तुंग षटकार व नऊ खणखणीत चौकार मारले. महेश मुळेकर याने ५६ चेंडूत ६४ धावांची बहारदार खेळी केली. महेश याने आठ चौकार मारले. पांडुरंग  धांडे याने २४ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी करताना दोन षटकार व चार चौकार मारले. गोलंदाजीत राहुल गंगावणे याने २० धावांत दोन गडी बाद केले.
 
संक्षिप्त धावफलक : १) श्रुती इंडस्ट्रीज : १८.३ षटकात सर्वबाद १२१ (आशिष गवळी ११, नितीन चव्हाण ६, योगेश चौधरी ४८, मोहम्मद इम्रान नाबाद १२, भगवान नरवडे ११, इतर २०, विनोद लंबे ३-२४, स्वप्नील मोरे ३-२४, राहुल दांडगे २-१५, व्यंकटेश सोनवलकर १-२८, शशिकांत पवार १-१९) विजयी विरुद्ध एनआरबी : १९.५ षटकात सर्वबाद ११७ (सचिन शेडगे १०, शशिकांत पवार ५९, राहुल दांडगे ६, गौरव टेकाळे ५, वीरेंद्र थोटे ५, इतर १३, नितीन चव्हाण ३-२५, रुषिकेश नायर २-१३, योगेश चौधरी २-२७, भगवान नरवडे १-३). सामनावीर : योगेश चौधरी.

२) महावितरण : २० षटकात चार बाद १५३ (महेश मुळेकर ६४, पांडुरंग धांडे ४२, राहुल शर्मा ३७, राहुल गंगावणे २-२०, मयूर जे १-२३) पराभूत विरुद्ध डॉक्टर इलेव्हन : १७.३ षटकात तीन बाद १५४ (गिरीश गाडेकर ६५, कार्तिक बाकलीवाल ११, संदीप नागरे ११, मयूर जे नाबाद २३, संतोष बनकर नाबाद १७, इतर २७, संजय बनकर १-२६, प्रदीप चव्हाण १-३०, राहुल शर्मा १-१७). सामनावीर : डॉ गिरीश गाडेकर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *