
रणजी करंडक क्रिकेट
नाशिक : सौरभ नवलेच्या नाबाद ६० धावांच्या बळावर महाराष्ट्र संघाने रणजी करंडक सामन्यात बडोदा संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर सात बाद २५८ धावसंख्या उभारली आहे.
गोल्फ क्लब मैदानावर हा सामना होत आहे. बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र संघाने ८६ षटकात सात बाद २५८ धावसंख्या उभारली. पवन शहा (१२) व मुर्तझा ट्रंकवाला (२२) ही सलामी जोडी लवकर बाद झाली. कर्णधार रुतुराज गायकावड २१ चेंडूत दोन चौकारांसह १० धावा काढून बाद झाला. त्यानंतर सिद्धेश वीर (४८) व यश क्षीरसागर (३०) यांनी डाव सावरला. ही जोडी बाद झाल्यानंतर सिद्धार्थ म्हात्रे अवघ्या ७ धावांवर तंबूत परतला.
सहा बाद १४५ अशा बिकट स्थितीतून सौरभ नवले, रामकृष्ण घोष आणि रजनीश गुरबानी या तळाच्या फलंदाजांनी संघाला सावरले. सौरभ नवले याने १२५ चेंडूंचा सामना करत नाबाद ६० धावा काढल्या आहेत. आपल्या चिवट खेळीत सौरभ नवले याने आठ चौकार मारले. रामकृष्ण घोष याने एक षटकार, एक चौकार ठोकत २६ धावा फटकावल्या. सौरभ आणि रामकृष्ण यांच्यात सातव्या विकेटसाठी ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. घोष बाद झाल्यानंतर रजनीश गुरबानी याने सौरभला सुरेख साथ देत नाबाद २२ धावा काढल्या. त्याने पाच चौकार लगावले. बडोदा संघाकडून अतित शेठ (३-४८), राज लिंबानी (२-४५) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
मुंबईचा डाव गडगडला
रोहित शर्मा रणजी सामना खेळत असल्याने या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, रोहितसह मुंबई संघाची सुमार कामगिरी झाली. मुंबई संघ अवघ्या ३३.२ षटकात १२० धावांत सर्वबाद झाला. यशस्वी जैस्वाल (४), रोहित शर्मा (३), हार्दिक तामोरे (७), अजिंक्य रहाणे (१२), श्रेयस अय्यर (११), शिवम दुबे (०), शम्स मुलाणी (०) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक ५१ धावा काढल्या. त्याने दोन षटकार व पाच चौकार मारले. तनुष कोटियन याने पाच चौकारांसह २६ धावांचे योगदान दिले. जम्मू काश्मीर संघाच्या उमर नजीर (४-४१) व युधवीर सिंग (४-३१) यांनी भेदक मारा केला. औकिब नबी याने ३६ धावांत दोन बळी घेतले.
जम्मू काश्मीर संघाने पहिल्या दिवसअखेर ४२ षटकात सात बाद १७४ धावा फटकावत आघाडी मिळवली आहे. शुभम खजुरिया (५३), यावर हसन (२९), आबिद मुश्ताक (४४) यांनी सुरेख फलंदाजी केली. मुंबई संघाकडून मोहित अवस्थी (३-३४), शम्स मुलाणी (२-६१), शार्दुल ठाकूर (१-२९), शिवम दुबे (१-३०) यांनी विकेट घेत सामन्यात रंगत आणली आहे.
विदर्भ संघ अडचणीत
विदर्भ संघाविरुद्ध राजस्थान संघाने पहिल्या दिवसअखेर ६४ धावांची आघाडी घेतली आहे. विदर्भ संघ प्रथम फलंदाजी करताना ५७.३ षटकात १६५ धावांत सर्वबाद झाला. करुण नायर याने सर्वाधिक ३९ धावा काढल्या. अक्षय वाडकर (३४), भुते (३४) यांनी डाव सावरला. खलील अहमद याने ३७ धावांत पाच विकेट घेतल्या. मानव सुधार याने ४० धावांत तीन बळी टिपले.
राजस्थान संघाने ३० षटकात पाच बाद १०१ धावा काढल्या आहेत. महिपाल लोमरोर याने नाबाद ४४ धावा काढत डाव सावरला. शुभम कापसे याने १७ धावांत दोन गडी बाद केले. नचिकेत भुते, आदित्य ठाकरे, हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.