
नागपूर विभागाचा संघ उपविजेता, पुणे विभागाने पटकावला तिसरा क्रमांक
सोलापूर : राज्यस्तरीय आंतर शालेय १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावित विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली आहे.
नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूर विभागाने नागपूर विभागाचा २० धावांनी पराभव केला. कोल्हापूर विभागाच्या श्री साई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोल्हापूर तर नागपूर विभागाच्या श्री राजेंद्र हायस्कूल नागपूर या संघामध्ये अंतिम सामना झाला.
कोल्हापूरने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात ५ बाद ९७ धावा केल्या. नागपूर विभागाने १५ षटकात ८ बाद ७६ धावा केल्या. कोल्हापूरकडून परिणिता पाटील हिने ३२ धावा व श्रुतिका पाटील हिने २० धावा केल्या. नागपूर विभागाच्या वतीने अक्षरा ईटणकर व श्रेया लांजेवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. कोल्हापूर संघाकडून सुहानी कहांडळ हिने तीन गडी टिपले.
विजेत्यांना पारितोषिके वितरण हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्हचे पृथ्वीराज सुरवसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, माजी तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, निवड समिती सदस्य जयराज मुंडे, राकेश उबाळे, क्रीडा अधिकारी सुनील धारूरकर, नदीम शेख, गणेश पवार, प्रा प्रमोद चुंगे, खंडू शिंदे, पंचप्रमुख बाळासाहेब रनवरे, मंजीत नवले आदी उपस्थित होते.
पुणे विभाग तृतीय
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पुणे विभागाने छत्रपती संभाजीनगर विभागावर ५१ धावांनी मात केली. पुणे विभागाकडून श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संगमनेर खुर्द (जिल्हा अहिल्यानगर) विरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरा गांधी विद्यालय जवळा बाजार (हिंगोली) यामध्ये हा सामना झाला. यात पुणे विभागाने १० षटकात २ बाद १०१ धावा केल्या. पुणे विभागाकडून आदिती राऊत हिने २९ धावा व साईश्री चौरे हिने २१ धावा केल्या. प्रतिउत्तरात छत्रपती संभाजीनगर संघाने ७ बाद ४९ धावा केल्या.