
जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते गौरव
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते तालुका क्रीडा समन्वयक यांचा क्रीडादूत पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी प्रत्येक तालुक्यात दहा शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी तालुका क्रीडा समन्वयक यांची नियुक्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येते. तालुका क्रीडा समन्वयक हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका यातील महत्वाचा दुवा असतो व ते या शालेय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत असतात व प्राविण्यप्राप्त खेळाडू अथवा संघ जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी पाठवीत असतात. शैक्षणिक वर्षात तालुका क्रीडा समन्वयक हे आलेल्या समस्या स्थानिक स्तरावर सोडवून स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत असतात.
या महत्वाच्या कार्याबद्दल जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या संकल्पनेतून प्रथमच जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा समन्वयकांचा क्रीडा दूत सन्मानाने सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. तालुका क्रीडा समन्वयकांचा अशा प्रकारे गुणगौरव प्रथमच करण्यात आला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जिल्हा क्रीडा संकुल येथे एका कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी व मीनल थोरात, क्रीडा अधिकारी डॉ सुरेश थरकुडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू कोमल भाकरे यांच्या उपस्थितीत तालुका क्रीडा समन्वयक यांना गौरविण्यात आले. यात राजेश जाधव (जळगाव शहर), प्रशांत कोल्हे (जळगाव तालुका), सचिन सूर्यवंशी (धरणगाव), प्रा मनोज पाटील (एरंडोल), डॉ आसिफ खान (रावेर), डॉ प्रदीप साखरे (भुसावळ), राजेंद्र आल्हाट (चोपडा), दिलीप संगेले (यावल), सुनील वाघ (अमळनेर), युवराज माळी (रावेर), प्रा गिरीश पाटील (पाचोरा), संदीप पवार (पारोळा) यांचा क्रीडादूत सन्मानाने गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी डॉ सुरेश थरकुडे यांनी केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांनी आभार मानले.