
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : योगेश चौधरी, राम राठोड सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत श्रुती इंडस्ट्रीज आणि शहर पोलिस या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या लढतींमध्ये योगेश चौधरी आणि राम राठोड यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात श्रुती इंडस्ट्रीज संघाने मासिया संघाचा सहा विकेट राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मासिया संघाने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकात सर्वबाद ११० असे माफक लक्ष्य उभे केले. श्रुती इंडस्ट्रीज संघाने १८.१ षटकात चार बाद ११३ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात निकित चौधरी (३४), योगेश चौधरी (३४), मोहम्मद इम्रान (२९) यांनी सुरेख फलंदाजी करत आपले योगदान दिले. गोलंदाजीत योगेश चौधरी याने ३३ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला आणि अष्टपैलू कामगिरी बजावली. रमेश साळुंके (२-१३) आणि गिरीश खत्री (२-२०) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी दोन बळी घेतले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात शहर पोलिस संघाने ७५ धावांनी सामना जिंकत अंतिम फेरी गाठली आहे. शहर पोलिस संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १७५ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना डॉक्टर इलेव्हन संघ १६.१ षटकात १०० धावांवर सर्वबाद झाला.
या सामन्यात कार्तिक बाकलीवाल (३६), पांडुरंग गाजे (३४), सुदर्शन एखंडे (३०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत राम राठोड याने १२ धावांत चार विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राजू परचाके याने ३० धावांत तीन गडी टिपले. आसिफ बियाबानी याने ३८ धावांत दोन गडी बाद केले.
शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा
व्हेरॉक उद्योग समुहाने आयोजित केलेल्या आंतर शालेय आणि औद्योगिक या दोन्ही क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (२५ जानेवारी) होणार आहे. दोन्ही स्पर्धेतील अंतिम सामन्यांनंतर हा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक विनय कुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल अशी माहिती स्पर्धा आयुक्त राहुल टेकाळे यांनी दिली.
संक्षिप्त धावफलक : १) मासिया : १७ षटकात सर्वबाद ११० (निकित चौधरी ३४, रोहन राठोड ९, मुकीम शेख १७, रोहन शहा १९ मधुर पटेल ५, योगेश चौधरी ४-३३, भगवान नरवडे २-२९, रमेश साळुंके २-१३) पराभूत विरुद्ध श्रुती इंडस्ट्रीज : १८.१ षटकात चार बाद ११३ (योगेश चौधरी ३४, नितीन चव्हाण ६, मोहम्मद इम्रान नाबाद २९, रुषिकेश नायर नाबाद २५, इतर १२, गिरीश खत्री २-२०, सय्यद सरफराज १-१३, वसीम मस्तान १-२२). सामनावीर : योगेश चौधरी.
२) शहर पोलिस : २० षटकात सात बाद १७५ (राम राठोड २९, पांडुरंग गाजे ३४, सुदर्शन एखंडे ३०, ओंकार मोगल १६, राहुल जोनवाल २०, रणजीत पाटील १७, रिझवान अहमद नाबाद ७, आसिफ शेख नाबाद २, इतर १६, आसिफ बियाबानी २-३८, आमेर बदाम १-३४, मयूर जे १-३०, राजेश चौधरी १-१८, संदीप नागरे १-१२) विजयी विरुद्ध डॉक्टर इलेव्हन : १६.१ षटकात सर्वबाद १०० (कार्तिक बाकलीवाल ३६, संदीप नागरे ६, अल्ताफ शेख ७, संतोष बनकर ७, राजेंद्र चोपडा १४, आसिफ बियाबानी नाबाद १४, राजू परचाके ३-३०, राम राठोड ४-१२, रणजीत पाटील १-२५, पांडुरंग गाजे १-८, जिलानी शेख १-८). सामनावीर : राम राठोड.