
प्रजासत्ताक दिनी पुरस्काराचे वितरण करण्याची प्रा जयपाल रेड्डी यांची मागणी
नांदेड : नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने चार वर्षांच्या कालावधीत प्रलंबित क्रीडा पुरस्कार तातडीने वितरित करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक आणि क्रीडा युवकाचे प्रदेश सरचिटणीस प्रा जयपाल रेड्डी यांनी क्रीडा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयाने २०२०-२०२१, २०२१-२०२२, २०२२-२०२३, २०२३-२०२४ या वर्षांतील जिल्हा क्रीडा पुरस्कार अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. चार वर्षांच्या कालावधीतील जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा करुन ते वितरित करण्यात यावेत अशी मागणी प्रा जयपाल रेड्डी यांनी केली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिलेल्या एका जाहिरातीनुसार नांदेड जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना, खेळाडू यांनी आपले प्रस्ताव क्रीडा कार्यालयात सादर केले आहेत. परंतु, गेल्या चार वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. या क्रीडा पुरस्कारांचे वितरण प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले जाते. परंतु, नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्याबाबत उदासीन दिसत आहे.
२०३६ ऑलिम्पिक भारतात भरवण्याचे स्वप्न बाळगत असताना नांदेडचे जिल्हाधिकारी खेळाविषयी गांभीर्य दाखवत नाहीत ही खेदाची बाब आहे. त्वरित त्यांनी मागवलेले प्रस्ताव पडताळणी झालेली असून गर्दीच्या नावाखाली खेळाडू मार्गदर्शक यांच्या भावनेशी नवीन खेळ खेळला जात आहे. प्रजासत्ताक दिनी खेळाडू व मार्गदर्शक यांचे मागील चार वर्षांपासून प्रलंबित जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरित करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा विभाग अंतर्गत प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार याची नोंद घ्यावी असा इशारा प्रदेश सरचिटणीस प्रा जयपाल रेड्डी यांनी दिला आहे.
प्रा जयपाल रेड्डी यांनी हे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री (नांदेड), खासदार रवींद्र पाटील (नांदेड), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा विभाग प्रदेश प्रमुख समिता गोरे, क्रीडा आयुक्त (पुणे), प्रदेश समन्वयक कुमार कुर्तडीकर, जिल्हाधिकारी (नांदेड), जिल्हा क्रीडा अधिकारी (नांदेड) यांना पाठवले आहे.