
पुणे : एनईसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील दीर्घकाळ चालत असलेली प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून यंदाच्या वर्षीच्या मालिकेत स्पर्धेच्या रकमेत वाढ झाली असून ती आता आयटीएफ ७५ हजार डॉलर करण्यात आली आहे.
डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी (एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली २४व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ ७५ हजार डॉलर महिला टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना, एआयटीए यांच्या पुढाकाराने यावर्षी या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावण्यात आला असून गतवर्षीच्या ५० हजार डॉलर रकमेची स्पर्धा आता यावर्षी ७५ हजार डॉलर आयोजित करण्यात आली आहे. पुढील वर्षी ही स्पर्धा आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार असून यावर्षी ही स्पर्धा १ लाख डॉलर करण्याचा आमचा मानस असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.
२४ वर्षांपुर्वी नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटीच्या अनुराधा देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने एकाच प्रयोजकाचा पाठिंबा लाभलेली आणि सर्वाधिक कालावधीसाठी सुरु असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा असल्याचे डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक डॉ. विक्रांत साने यांनी सांगितले.
या स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार व भारती विद्यापीठ सचिव डॉ. विश्वजित कदम आणि एनइसीसीचे बीएसआर शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे.
खेळाडूंची मानांकन यादी
१. दारजा सेमेनिस्तजा (लात्विया, २. लिओलिया जीनजीन (फ्रांस), ३. सारा बिजलेक (चेक प्रजासत्ताक), ४. पन्ना उदावर्दी (हंगेरी), ५. कॅथीन्का वॉन डीचमन (लिकटेंस्टाईन), ६. एरियन हार्टोनो (नेदरलँड), ७. लॉरा पिगोस्सी (ब्राझील), ८. लानलाना तारारुडी (थायलंड).