
राष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धा : महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी गौरव तत्तापूरे
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय सबज्युनियर कॉर्फबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या गौरव तत्तापूरे याची महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तसेच राज्य संघात आदित्य कुंटे, नंदिनी सूर्यवंशी, अनुश्री खोमणे या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या वरिष्ठ कॉर्फबॉल संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड याची निवड करण्यात आली आहे.

भारतीय कॉर्फबॉल महासंघ व लव्हली प्रोफेश्नल विद्यापीठ जालंदर यांच्या संयुक्त विद्यमाने लव्हली प्रोफेश्नल विद्यापीठ जालंदर येथे २०व्या सब-ज्युनिअर व ३६व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन येत्या ३० जानेवारी ते २ फेबुवारी दरम्यान करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कॉर्फबॉल संघटनेच्या वतीने टी सी महाविद्यालय, बारामती येथे महाराष्ट्र संघ निवड चाचणी व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमधून महाराष्ट्र राज्याच्या सब-ज्युनिअर कॉर्फबॉल संघाच्या उपकर्णधारपदी छत्रपती संभाजीनगरच्या गौरव तत्तापूरे याची निवड करण्यात आली. राज्याच्या सब ज्युनिअर कॉर्फबॉल संघात आदित्य कुंटे, नंदिनी सूर्यवंशी व अनुश्री खोमणे यांची निवड झाली आहे. तसेच राज्याच्या वरिष्ठ कॉर्फबॉल संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड याची निवड झाली आहे.

एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल मुख्य प्रशिक्षक गणेश कड यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले आहे. तसेच स्वाभिमान क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक पंकज परदेशी व परिमल बास्केटबॉल अकादमीचे प्रशिक्षक विजय मालकर यांचे देखील खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे.

राष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेसाठी झालेल्या सर्व खेळाडूंचे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव हेमंत पातूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मकरंद जोशी, विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, तसेच राज्य कॉर्फबॉल संघटनेचे किशोर बागडे, प्रवीण मानवतकर, डॉ गौतम जाधव, सचिन वावले, अशोक देवकर, राजेंद्र साबळे, जिल्हा हौशी कॉर्फबॉल संघटनेचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मोहिते, उपाध्यक्ष डॉ उदय डोंगरे, सचिव गणेश कड, सहसचिव प्रशांत बुरांडे, सचिन तत्तापूरे, विश्वास कड, मंदा कड, अनिस साहुजी आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.