
मुंबई : विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धेत सरस्वती स्पोर्ट्स, ओम साईश्वर, रचना नोटरी, महावितरण कंपनीचे जोरदार विजय नोंदवले. व्यावसायिक पुरुष गटात मध्य रेल्वे, रचना नोटरी या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
४ फुट ११ इंच किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (४-२-११-७) १५-९ असा ६ गुणांनी पराभव केला. या सामन्यात मेहक अडवडे, निहाल शिंदे, देवेंद्र शिंदे यांनी सुरेख कामगिरी नोंदवली.
४ फुट ११ इंच किशोरांच्या दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा (४-२-२-२) ६-४ असा २ गुणांनी पराभव केला. या लढतीत अधिराज गुरव, शातिक गामी, पवन गुरव, ओमकार जाधव यांनी शानदार खेळ केला.
व्यावसायिक महिला गट
व्यावसायिक महिला गटाच्या पहिल्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने मुंबई पोलीस संघाचा (८-४-२-५) १०-९ असा ५ मिनिटे राखून १ गुणाने पराभव केला. या सामन्यात सेजल यादव, श्वेता जाधव, काजल शेख, प्रिया भोर, ईशाली आंब्रे यांनी प्रेक्षणीय खेळ केला. व्यावसायिक महिला गटाच्या दुसऱ्या सामन्यात महावितरण कंपनीने महाराष्ट्र पोस्ट संघाचा (४-५-४-२) ८-७ असा १ गुणांनी पराभव केला.
व्यावसायिक पुरुष गट
व्यावसायिक पुरुष गटाच्या दुसऱ्या सामन्यात मध्य रेल्वेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (७-५-४-४) ११-९ असा २ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. या सामन्यात मिलिंद चावरेकर, संकेत कदम, विजय हजारे, सुरज झोरे, राज सकपाळ यांनी शानदार खेळ केला.
व्यावसायिक पुरुष गटाच्या पहिल्या सामन्यात रचना नोटरी वर्क्स संघाने बृहन्मुंबई महानगर पालिकेचा (७-५-६-६) १३-११ असा २ गुणांनी पराभव केला. या सामन्यात वेदांत देसाई, संकेत जाधव, धीरज भावे, रामचंद्र झोरे, पियुष घोलम यांनी बहारदार खेळ केला.