
हिंगोली : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ नागनाथ गजमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तराखंड राज्यातील हल्दवानी येथे २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये ३८ क्रीडा प्रकारात संपूर्ण भारतातील जवळपास १० हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला खो-खो संघ सहभागी होणार असून महाराष्ट्र खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून वसमत येथील बहिर्जी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ नागनाथ गजमल यांची नियुक्ती झाली आहे. तसेच यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे तीन वेळेस व स्वामी रामानंद विद्यापीठाचे मुला मुलींच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून अनेक वेळेस काम पाहिले आहे. त्यांनी घडवलेल्या अनेक खेळाडूंची विद्यापीठ पातळीवर व महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे.