कबड्डी स्पर्धेत खडकेवाडा संघ विजेता, महागाव संघ उपविजेता

  • By admin
  • January 25, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

गवसे येथे कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन 

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील निसर्गरम्य गवसे गावाने नुकतीच वार्षिक मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. २१ ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित या स्पर्धेत ५५ किलो वजनी गटातील नामवंत कबड्डी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उत्कृष्ट आयोजन आणि मान्यवरांची उपस्थिती
ही स्पर्धा रवळनाथ कबड्डी संघाचे प्रशिक्षक देवेंद्र पाटील व क्रीडा प्रेमी मारुती डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच गवसेतील तरुण वर्गाच्या परिश्रमातून यशस्वी झाली. उद्घाटन प्रसंगी गवसे गावाचे सुपुत्र आणि पॉवरलिफ्टिंग रायगडचे सचिव, राष्ट्रीय पंच अरुण यशोदा लक्ष्मण पाटकर, सदस्य संदीप लक्ष्मी कृष्णा पाटकर, तसेच निपाणीचे सेवानिवृत्त कर्नाटक शासकीय सहाय्यक अधिकारी (शिक्षण विभाग) आणि क्रीडाप्रेमी, ज्येष्ठ नागरिक शिवाजी तिकोटे, गवसे गावचे माजी सरपंच महादेव ज्योतिबा हेंबाळकर, सुरज गिलबिले, कृष्णा रामा पाटकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाचा सोहळा श्रीफळ फोडून उत्साहात पार पडला.

विजेत्या संघांचा सन्मान

या स्पर्धेत खडकेवाडा कबड्डी संघाने विजेतेपद पटकावले. त्यांना कै. ज्योतिबा बाळा हेबाळकर स्मरणार्थ रोख ७००१ रुपयांचे बक्षीस सर्जेराव बाळासाहेब हेबाळकर आणि सुरेश गिलबिले यांच्याकडून देण्यात आले. तसेच संदीप पाटकर यांनी कै. तातोबा जानू पाटकर यांच्या स्मरणार्थ चषक प्रदान केला.

उपविजेत्या महागाव कबड्डी संघाला कै. शामराव चंद्रू पाटील स्मरणार्थ रोख ५००१ रुपये बक्षीस रोशन नामदेव माडभगत आणि रोहित रवींद्र पाटील यांनी दिले. कै. रामा जानू पाटकर यांच्या स्मरणार्थ चषक संदीप पाटकर यांनी दिला. 

तृतीय क्रमांक मडिलगे (गारगोटी) संघाने पटकावला. त्यांना मारुती रामचंद्र डोंगरे यांच्या वतीने रोख ३००१ रुपये देण्यात आले. संदीप लक्ष्मी कृष्णा पाटकर यांनी कै. लक्ष्मण जानू पाटकर यांच्या स्मरणार्थ चषक दिला.

विशेष पुरस्कार
उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना अरुण यशोदा लक्ष्मण पाटकर यांनी आकर्षक चषक दिले. तर निलेश यादव, आणि सुयश लाड यांच्या वतीने  रोख रक्कम देण्यात आली.

पॉवरलिफ्टिंग रायगडचे सचिव अरुण पाटकर यांनी पाटकर कुटुंबीयांतर्फे दरवर्षी कबड्डी सामन्यांसाठी अंतिम विजेते, उपविजेते यांना आकर्षक चषकआणि उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड, आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना आकर्षक चषक रोख रकमेसह देण्याचे घोषित केले.

स्पर्धेचा आकर्षक क्षण
ही कबड्डी स्पर्धा गवसे गावात प्रथमच आयोजित केली गेली. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग आणि देणगीदारांच्या सहकार्यामुळे स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली. स्पर्धेत खडकेवाडा संघाच्या विजयाचा जल्लोष आणि महागाव संघाच्या दमदार कामगिरीची चर्चा सर्वत्र रंगली.

स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य
या सामन्यांच्या आयोजनात सुरज शेटगे, दशरथ नवार, रोशन माडभगत, मंदार पाटील,वेदांत नेवगे, रोहित माडभगत, भूषण पाटील, निशांत पेडणेकर, संकेत नवार, अपूर्व पाटील, आदिनाथ पाटील, सुनील गोसावी, कार्तिक पाटील, अनिकेत पाटील, सौरभ पाटील, श्रीधर पाटील, समीर डोंगरे, वैभव पाटील , जयवंत पाटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गवसेतील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा
या स्पर्धेच्या माध्यमातून गवसे गावात कबड्डी खेळाबद्दलची ओढ वाढली आहे. स्थानिक तरुणांनी घेतलेला पुढाकार आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा या आयोजनाचा यशाचा मुख्य आधार ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *