
पाकिस्तानच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा घडले
मुलतान : पाकिस्तान क्रिकेट संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज नोमान अली याने शनिवारी इतिहास रचला. मुलतान येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने हॅटट्रिक घेत इतिहास रचला. त्याने १२ व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूत तीन विकेट्स घेतल्या. कसोटीत हॅटट्रिक घेणारा नोमन हा पहिला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज आहे.
नोमान याने प्रथम जस्टिन ग्रीव्हजला बाद केले आणि नंतर पुढच्या दोन चेंडूंमध्ये त्याने टेविन इमलाच आणि केविन सिंक्लेअरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पाकिस्तान संघ ७२ वर्षांपासून कसोटी सामने खेळत आहे पण आतापर्यंत त्यांच्या एकाही फिरकी गोलंदाजाला कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेता आलेली नाही. हा दुष्काळ नोमन याने संपवला.
नोमनने आपल्या फिरकी गोलंदाजीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना नाचवले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले. या हॅटट्रिकसह नोमान याने वेस्ट इंडिजची धावसंख्या सात बाद ३८ धावा अशी खराब केली. नोमन याचा पुढचा बळी केमार रोच होता. तो पायचीत बाद झाला. रोच याच्या रूपाने वेस्ट इंडिजने आपली नववी विकेट गमावली.
कसोटी सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या खास खेळाडूंच्या यादीत नोमनचा समावेश झाला आहे. नोमान व्यतिरिक्त, वसीम अक्रम, मोहम्मद सामी आणि नसीम शाह यांनी पाकिस्तानसाठी हे काम केले आहे. ते सर्व वेगवान गोलंदाज आहेत. अक्रमने कसोटी सामन्यात दोनदा हॅटट्रिक घेतली आहे. १९९८-९९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध अक्रमने त्याची पहिली हॅटट्रिक घेतली. त्याने या वर्षी त्याची दुसरी हॅटट्रिक घेतली. २००१-०२ मध्ये, सामीने लाहोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. नसीम शाहने २०२० मध्ये रावळपिंडी येथे बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि यासोबत तो पाकिस्तानसाठी कसोटीत हॅटट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज बनला.
नोमान सध्या पाकिस्तान संघाचा स्टार आहे. त्याच्या आणि साजिद खानच्या जोडीमुळे पाकिस्तानमध्ये फलंदाजांना विकेटवर टिकून राहणे कठीण झाले आहे. या दोघांनीही अलिकडच्या कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेपासून, दोघेही सतत विकेट्स घेत आहेत आणि नवीन विक्रम लिहित आहेत.