जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने नांदेड क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण
नांदेड : गेल्या चार वर्षांपासून नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरणाला अखेर मुहूर्त लाभला असून रविवारी (२६ जानेवारी) पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी कळवली आहे.

‘स्पोर्ट्स प्लस’ या डिजिटल क्रीडा दैनिकाने शनिवारी नांदेड जिल्ह्याचे क्रीडा पुरस्कार चार वर्षांपासून रखडल्याचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी युवक आणि क्रीडा युवकाचे प्रदेश सरचिटणीस प्रा जयपाल रेड्डी यांना फोनद्वारे संपर्क साधून क्रीडा पुरस्काराचा प्रश्न तात्काळ निकाली लावण्यात येत असल्याचे सांगितले आणि आंदोलन करू नये असे सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी २०२० ते २०२४ या कालावधीत प्रलंबित राहिलेल्या क्रीडा पुरस्कार प्रस्तावांची छाननी करून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे टिपणी सादर केली. दरम्यान, प्रा जयपाल रेड्डी यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क साधत या प्रश्नाची माहिती दिली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रश्नी तातडीने कार्यवाही करत हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे नांदेड क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रा जयपाल रेड्डी यांनी सांगितले.