
सौरभ नवलेचे नाबाद शतक, रामकृष्ण घोषचे शतक हुकले, रुतुपर्ण गायकवाडची धमाकेदार खेळी
नाशिक : महाराष्ट्र संघाने रणजी करंडक सामन्यात बडोदा संघाविरुद्ध तब्बल ६१६ धावांची आघाडी घेतली आहे. यष्टीरक्षक फलंदाज सौरभ नवले याने नाबाद शतक ठोकत सामन्याचा तिसरा दिवस गाजवला. सौरभ नवले (नाबाद १२६) याने रामकृष्ण घोष (९९) समवेत सातव्या विकेटसाठी १८० धावांची भागीदारी केली.

गोल्फ क्लब मैदानावर हा सामना होत आहे. महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात सर्वबाद २९७ धावा काढल्या. त्यानंतर महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजांनी बडोदा संघाला ३३.१ षटकात १४५ धावांवर सर्वबाद केले. मितेश पटेलने सर्वाधिक ६१ धावा काढल्या. मुकेश चौधरी (३-५७) रजनीश गुरबानी (२-३१), रामकृष्ण घोष (२-३४) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात ११९ षटके फलंदाजी करत सात बाद ४६४ धावसंख्या उभारत ६१६ धावांची आघाडी घेतली आहे. यष्टीरक्षक सौरभ नवले याने पहिल्या डावात ८९ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात सौरभने नाबाद १२६ धावा फटकावत सामना गाजवला. रामकृष्ण घोष ९९ धावांवर बाद झाला. कर्णधार रुतुराज गायकवाड याने दोन षटकार व १४ चौकारांसह ८९ धावांची आक्रमक खेळी केली. सिद्धेश वीर (४१), यश क्षीरसागर (३९), रजनीश गुरबानी (नाबाद १९) यांनी आपले योगदान दिले. बडोदा संघाकडून लुकमान मेरीवाला (२-३९), अतित शेठ (२-८०) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.