
व्योम खर्चे, योगेश चौधरी मालिकावीर, शानदार सोहळ्यात पारितोषिकांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : व्हेरॉक उद्योग समुहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्हेरॉक आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत केंब्रिज स्कूल संघाने विजेतेपद पटकावले. औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलिस संघाने व्हेरॉक करंडक जिंकला. या सामन्यात व्योम खर्चे आणि ओंकार मोगल यांनी सामनावीर किताब पटकावला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. आंतरशालेय व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना वुडरिज हायस्कूल आणि केंब्रिज स्कूल यांच्यात झाला. केंब्रिज स्कूल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वुडरिज हायस्कूल संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकात सर्वबाद ९१ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना केंब्रिज स्कूल संघाने १५.३ षटकात दोन बाद ९४ धावा फटकावत विजेतेपद पटकावले.
या सामन्यात व्योम खर्चे (६३), निषाद जोशी (२६) व समर्थ तोतला (२२) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत अथर्व तोतला (३-२१), व्योम खर्चे (२-७) व समरवीर पाटील (२-१२) यांनी प्रभावी स्पेल टाकला.
औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलिस आणि श्रुती इंडस्ट्रीज यांच्यात विजेतेपदासाठी सामना झाला. यात शहर पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २० षटकात सर्वबाद १५३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रुती इंडस्ट्रीज संघ २० षटकात सर्वबाद १४१ धावसंख्या उभारू शकला. शहर पोलिस संघाने १२ धावांनी सामना जिंकला आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात ओंकार मोगल (६०), योगेश चौधरी (३०), रमेश साळुंके (२६) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. गोलंदाजीत योगेश चौधरी (३-३६), राजू परचाके (२-१९) आणि रुषिकेश नायर (२-२९) यांनी प्रभावी स्पेल टाकत विकेट घेतल्या.
पारितोषिक वितरण सोहळा
महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, सहआयुक्त प्रशांत स्वामी, जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सतीश मांडे, विशाल निधालकर, राहुल टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास स्पर्धा सचिव राहुल टेकाळे, अनंत नेरळकर, सय्यद जमशीद, मच्छिंद्र जाधव हे उपस्थित होते. अंतिम सामन्यांचे धावते वर्णन श्याम देशमुख व अमृत बिऱ्हाडे यांनी शानदारपणे केले. पूजा करवा यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
सामनावीर : व्योम खर्चे व ओंकार मोगल
गोलंदाज : अथर्व तोतला व राजीव परचाके
फलंदाज : राघव नाईक व शेख मुकीम
मालिकावीर : व्योम खर्चे व योगेश चौधरी
संक्षिप्त धावफलक : १) वुडरिज हायस्कूल : १९.४ षटकात सर्वबाद ९१ (समरवीर पाटील १२, दक्ष सिंघवी ११, निषाद जोशी २६, शौर्य सूर्यवंशी १३, इतर १७, अथर्व तोतला ३-२१, व्योम खर्चे २-७, ध्रुव देखणे १-२१, आर्यन खेडकर १-१८) पराभूत विरुद्ध केंब्रिज स्कूल : १५.३ षटकात दोन बाद ९४ (व्योम खर्चे नाबाद ६३, समर्थ तोतला नाबाद २२, समरवीर पाटील २-१२). सामनावीर : व्योम खर्चे.
२) शहर पोलिस : २० षटकात सर्वबाद १५३ (राम राठोड १५, पांडुरंग गाजे २४, ओंकार मोगल ६०, राहुल जोनवाल ६, रिझवान अहमद २३, योगेश चौधरी ३-३६, रुषिकेश नायर २-२९, मोहम्मद इम्रान १-२९, भगवान नरवडे १-२६, रमेश साळुंके १-२९) विजयी विरुद्ध श्रुती इंडस्ट्रीज : २० षटकात सर्वबाद १४१ (नितीन चव्हाण २३, रुषिकेश नायर १८, आशिष गवळी ५, योगेश चौधरी ३०, रमेश साळुंके २६, दिनेश पौरा १२, पांडुरंग गाजे २-३६, राजू परचाके २-१९, ओंकार मोगल १-२२, जिलानी शेख २-३९). सामनावीर : ओंकार मोगल.