
भारताची शेवटच्या षटकात इंग्लंडवर दोन विकेटने मात
चेन्नई : तिलक वर्माच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या टी २० सामन्यात इंग्लंड संघाचा दोन विकेटने पराभव केला. या रोमांचक विजयासह भारताने पाच टी २० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघासमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान होते. मात्र, भारतीय संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन (५), अभिषेक शर्मा (१२) हे आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव याने तीन खणखणीत चौकार मारले. परंतु, तो १२ धावांवर तंबूत परतला. सूर्या बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल (४), हार्दिक पांड्या (७) हे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. त्यावेळी भारतीय संघाची स्थिती पाच बाद ७८ अशी बिकट झाली.
तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सातव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. सुंदर १९ चेंडूत २६ धावा काढून बाद झाला. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. अक्षर पटेल २ धावांवर बाद झाला आणि भारताची स्थिती सात बाद १२६ अशी बिकट झाली. ३१ चेंडूत ४० धावांची गरज असताना सर्व जबाबदारी तिलक वर्मावर आली. तिलक वर्माने एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना ५५ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी करत भारताला तणावस्थितीत विजय मिळवून दिला. त्याने पाच उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. रवी बिश्नोई याने पाच चेंडूत नाबाद ९ धावा काढल्या. त्याने महत्त्वाचे दोन चौकार मारले. भारताने १९.२ षटकात आठ बाद १६६ धावा फटकावत दोन विकेटने सामना जिंकला. इंग्लंडकडून ब्रायडन कार्से याने २९ धावांत तीन गडी बाद केले.
इंग्लंड नऊ बाद १६५
सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सॉल्ट (४), बेन डकेट (३) ही सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. कर्णधार जोस बटलर याने पुन्हा एकदा डाव सावरताना ३० चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात बटलर सीमारेषेवर झेलबाद झाला. बटलर याने ३ उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले.
दुसऱ्या बाजूने हॅरी ब्रुक (१३), लिव्हिंगस्टोन (१३), जेमी ओव्हरटन (५) हे आक्रमक फलंदाज झटपट बाद झाले. जेमी स्मिथ (२२) याने दोन षटकार व एक चौकार मारत एक छोटीशी सुरेख खेळी केली. ब्रायडन कार्से याने १७ चेंडूत ३१ धावा फटकावत सामन्यात रंगत आणली. त्याने तीन टोलेजंग षटकार व एक चौकार मारला. दुर्देवाने तो धावबाद झाला. जोफ्रा आर्चर (नाबाद १२), आदिल रशीद (१०), मार्क वुड (नाबाद ५) या तळाच्या फलंदाजांनी धावफलक हलता ठेवला. त्यामुळे इंग्लंडने २० षटकात नऊ बाद १६५ धावसंख्या उभारण्यात यश आले.
भारतीय संघाच्या सर्वच गोलंदाजांनी सुरेख मारा केला. वरुण चक्रवर्ती (२-३८), अक्षर पटेल (२-३२) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग (१-४०), हार्दिक पांड्या (१-६), वॉशिंग्टन सुंदर (१-९), अभिषेक शर्मा (१-१२) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.