नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र सज्ज अजित पवारांच्या हस्ते ध्वज हस्तांतरण

  • By admin
  • January 26, 2025
  • 0
  • 143 Views
Spread the love

आपले क्रीडापटू पुन्हा विजेतेपद खेचून आणतील : अजित पवार

पुणे : डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्‍या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथक प्रमुख संजय शेटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्राचे खेळाडू गत स्पर्धेप्रमाणेच विजेतेपद खेचून आणतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाला शुभेच्छा देताना व्यक्त केला.

३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट टीम सज्ज झाली असून जागतिक पदक विजेती आर्चरी खेळाडू आदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांना महाराष्ट्र संघाचे ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. उद्घाटन सोहळ्यातील संचलनात फडविणार्‍या जाणारा ध्वजाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पथक प्रमुख संजय शेटे यांना स्वीकार केला. 
शिवाजीनगर येथील पोलिस मैदानातील ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी पार पडलेल्या ध्वज हस्तांतरण समारंभास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख संजय शेटे, उपपथकप्रमुख डॉ उदय डोंगरे, सुनील पूर्णपात्रे व स्मिता शिरोळे हे उपस्थित होते.

मानाचा ध्वज हस्तांस्तरित केल्यानंतर महाराष्ट्राच्या पथकास शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘गत स्पर्धेत विक्रमी २२८ पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्राचे खेळाडू गत स्पर्धेप्रमाणेच विजेतेपद खेचून आणतील. स्पर्धेतील विजेत्यांना राज्य शासनाकडून भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत.

एमओएचे महासचिव नामदेव शिरगावकर म्हणाले की, ‘यंदा महाराष्ट्राच्या संघाकडून ७१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकून देणारा स्वप्निल कुसाळे, राही सरनोबत, आदिती स्वामी, मयांक चाफेकर यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय पदकासाठी खेळतील. यावेळीही आम्ही निश्चितच सेनादलाला पुन्हा मागे टाकून संघाचा भगवा ध्वज देशात फडकवू. पथक प्रमुख संजय शेटे यांनी सांगितले की, ‘विमान प्रवासाने सर्व खेळाडू डेहराडून जात असून अनुभव संपन्न महाराष्ट्राच्या खेळाडू सर्वच क्रीडाप्रकारात बाजी मारताना दिसतील.

महाराष्ट्राचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हुकूमत गाजविणारे महाराष्ट्राचे दोन्ही खो-खो संघ (पुरूष व महिला)  उत्तराखंडला दाखल झाले आहेत. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात कसून सराव करून कबड्डीचे दोन्ही संघ स्पर्धेेसाठी रवाना झाले आहेत. पुरुष संघात आशियाई पदक विजेता आकाश शिंदे, प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू शिवम पठारे व पंकज मोहिते तर महिला संघात आशियाई पदक विजेती सोनाली शिंगटे, आम्रपाली गलांडे व निकिता पडवळ महाराष्ट्रासाठी पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. यावेळी स्पर्धेत प्रथमच बीच कबड्डीचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबईत  बीच कबड्डीचा सराव शिबिरा पार पडले असून हा संघ पहिलेवहिले ऐतिहासिक पदक जिंकण्यासाठी डेहराडून रवाना झाला आहे.

३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार असून ३२ विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ ९०० पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *