
चेन्नई : ‘दुसऱ्या टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला लक्ष्य करणे हा त्यांच्या रणनीतीचा एक भाग होता आणि इंग्लंडच्या सर्वोत्तम गोलंदाजाला निष्क्रिय करणे आणि उर्वरित संघाचे मनोबल खचवणे हा त्यांचा उद्देश होता असे भारतीय संगाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या तिलक वर्मा याने सांगितले.
तिलक वर्माने ५५ चेंडूत नाबाद ७२ धावा करत भारताला दोन विकेट्सनी रोमांचक विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तिलकने त्याच्या खेळीदरम्यान आर्चरच्या चेंडूवर चार षटकार मारले. त्यामध्ये डीप फाइन लेगवर एक अत्यंत खात्रीशीर पिक-अप फ्लिकचा समावेश होता. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात चार षटकांत २१ धावा देत दोन विकेट घेणाऱ्या आर्चरने दुसऱ्या सामन्यात चार षटकांत ६० धावा दिल्या. सामन्यानंतर तिलक म्हणाला, ‘मला त्यांच्या सर्वोत्तम गोलंदाजाला लक्ष्य करायचे होते. जर तुम्ही सर्वोत्तम गोलंदाजाला लक्ष्य केले तर इतर गोलंदाजांवर दबाव येईल. म्हणून, जेव्हा विकेट पडत असतात (दुसऱ्या टोकाला), तेव्हा मी विरोधी संघाच्या सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध आक्रमक दृष्टिकोन स्वीकारू इच्छितो.’
तिलक वर्मा म्हणाला की, ‘जर मी हे करण्यात यशस्वी झालो तर इतर फलंदाजांसाठी काम सोपे होईल. मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्यांच्याविरुद्ध संधी निर्माण केल्या. आर्चरविरुद्ध मी जे काही शॉट खेळले, मी नेटमध्ये त्यांच्यासाठी तयारी केली. मी मानसिकदृष्ट्या तयार होतो आणि म्हणूनच मला यश मिळाले. तो शेवटपर्यंत खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे आणि संघाच्या गरजेनुसार त्याच्या खेळात बदल करण्यास तयार आहे.’
तिलक वर्मा म्हणाला की, ‘मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मला शेवटपर्यंत राहायचंच आहे. गेल्या सामन्यादरम्यान मी गौतम गंभीर सरांशी बोललो होतो. संघाच्या गरजेनुसार मी निश्चित स्ट्राईक-रेटने खेळू शकतो. तुम्हाला परिस्थितीनुसार खेळावे लागेल. गौतम सरांनी इथे ड्रिंक्स ब्रेक दरम्यान असेही म्हटले होते की ही अशी संधी आहे जेव्हा तुम्ही लोकांना दाखवू शकता की तुम्ही सर्व प्रकारच्या डाव खेळण्यास सक्षम आहात. मी हे करण्यात यशस्वी झालो याचा मला आनंद आहे.’