
नवी दिल्ली : ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेश याचे कौतुक केले. राष्ट्रपती म्हणाल्या की, गेल्या वर्षी गुकेशने सर्वात तरुण विश्वविजेता बनून इतिहास रचला. भारताचा वाढता आत्मविश्वास क्रीडा क्षेत्रातही दिसून येतो, जिथे देशातील खेळाडूंनी रोमांचक यशोगाथा लिहिल्या आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, ‘खेळाडूंनी जिंकण्याच्या उत्साहाने देशाला अभिमानित केले आहे आणि पुढच्या पिढीला उच्च ध्येये साध्य करण्यासाठी प्रेरित केले आहे. यावेळी त्यांनी गुकेशचा विशेषतः उल्लेख केला आमच्या बुद्धिबळ विजेत्यांनी जगाला प्रभावित केले आणि आमच्या पुरुष आणि महिला खेळाडूंनी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २०२४ मध्ये खेळातील कामगिरीचे नेतृत्व डी गुकेश याने केले. गुकेशने सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता बनून इतिहास रचला.’
राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘एक राष्ट्र म्हणून आपला वाढता आत्मविश्वास क्रीडा क्षेत्रातही दिसून येतो, जिथे आपल्या खेळाडूंनी मनोरंजक यशोगाथा लिहिल्या आहेत. गेल्या वर्षी आमच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये आपला ठसा उमटवला. आम्ही पॅरालिम्पिक खेळांना आमचे सर्वात मोठे पथक पाठवले, जो आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीसह परतला. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, तळागाळातील चांगल्या प्रशिक्षण सुविधांद्वारे खेळाडूंना मदत केली जात आहे.’
भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली आणि त्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये सात सुवर्ण आणि नऊ रौप्य अशा २९ पदकांची कमाई करून इतिहास रचला. दुसरीकडे, बुद्धिबळपटू देखील चमकदार कामगिरी करत आहेत आणि पहिल्यांदाच भारताने बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या पुरुष आणि महिला दोन्ही सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. १८ वर्षांचा गुकेश उत्तम कामगिरी करत आहे. सर्वात तरुण विश्वविजेता होण्यासोबतच, त्याने ऑलिंपियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदकही जिंकले आणि भारताच्या विजयाचे शिल्पकार होते.