
राज्यस्तरीय इंटर इंजिनिअरिंग क्रिकेट स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय इंटर इंजिनिअरिंग क्रिकेट स्पर्धेत एमआयटी छत्रपती संभाजीनगर संघाने चमकदार कामगिरी नोंदवत उपविजेतेपद संपादन केले.
संदीप फाऊंडेशन नाशिकतर्फे राज्यस्तरीय इंटर इंजिनिअरिंग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील १६ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एमआयटी छत्रपती संभाजीनगर संघाने बहारदार कामगिरी नोंदवत उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एमआयटी संघाने पहिल्या सामन्यात नाशिकच्या एसआयटीआरसी संघाचा १२२ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात एमआयटी संघाने एसआयईएम संघावर ३९ धावांनी विजय मिळवला. उपांत्य फेरीत एमआयटी संघाने केबीटी सीओई संघाचा तब्बल १४७ धावांनी पराभव केला. अंतिम सामन्यात एमआयटी संघाला संदीप इलेव्हनकडून पराभव स्वीकारावा लागला. संदीप इलेव्हन संघाने सात विकेटने सामना जिंकला. या स्पर्धेत विशाल राठोड, आशिष पवार, अभिजीत खोंडकर, स्वप्नील राठोड, वरद नागपूरकर, रुकेश यादव या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावली.
या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या एमआयटी संघात आशिष पवार (कर्णधार), विशाल राठोड, सागर राठोड, स्वप्नील राठोड, रितेश देशमुख, अनिश पुजारी, दुष्यंत इंगळे, दीपक भावले, रुषी कुलकर्णी, साहिल दवंडे, सक्षांत गिरे, वरद नागपूरकर, सार्थक सुरडकर, रुकेश यादव, अभिजीत खोंडकर या खेळाडूंचा समावेश आहे.
एमआयटी ग्रुपचे महासंचालक प्रा मुनीश शर्मा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ निलेश पाटील, डॉ सय्यद अझीज, डॉ अमित रावटे, सचिन देशमुख आणि विलास त्रिभुवन यांनी संघाचे यशस्वी कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच शारीरिक शिक्षण संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी आणि क्रिकेट प्रशिक्षक प्रीतेश चार्ल्स यांचे संघाच्या तयारीसाठी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. एमआयटी संघाचा हा उल्लेखनीय प्रवास त्यांच्या समर्पण, संघ भावना, आणि चिकाटीचे प्रतीक आहे. त्यांच्या यशाने संस्थेला अपार अभिमान मिळवून दिला आहे.