
पुणे : सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रतिभा अरुण लोणे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिव श्याम गुरुकुल, ता. मोहोळ येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ८४ किलोग्रॅम खालील वजन गटात स्कॉट १७५ किलोग्रॅम, बेंचप्रेस ७२.५ किलोग्रॅम व डेडलिफ्ट १५७.५ किलोग्रॅम असे एकूण ४०५ किलोग्रॅम वजन उचलून हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रतिभा लोणे हिची भटिंडा, पंजाब येथे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे. प्रतिभाची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
प्रजासत्ताक दिनी महाविद्यालयात निवृत्त कर्नल सुभाष सावंत, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे, डॉ शुभांगी औटी, प्रा अनिल जगताप, प्रा विलास शिंदे यांच्या हस्ते पॉवरलिफ्टिंग बेल्ट, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन प्रतिभाचा सन्मान करण्यात आला. शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रीतम ओव्हाळ यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.